या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे…
पुन्हा एक दुर्देवी आत्महत्या……..आत्महत्येचं हे सत्र थांबत नाही, तसं पहायला गेलं तर अनेक जण नैराश्यात, ताण-तणावात आत्महत्या करतात. पण दरवेळी याची चर्चा होतेच असं नाही. सुशांत सिंह सेलिब्रेटी होता म्हणून मोठ्या प्रमाणावर राजकारण झालं, चर्चा झाली. खरं तर आयुष्य खूप छान आहे, पण थोडेसे लहान आहे असे विधात्याने यांच्याबाबतीत लिहिलेलं असावं का? कालपासून ओठांवर “या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे”….या मंगेश पाडगावकरांच्या गीताची आठवण होतेय, या गीताला संगीत साज चढविला यशवंत देव यांनी व अरुण दाते यांनी हे अजरामर गीत स्वरबद्ध केलंय. हे गीत प्रकर्षानं आठवण्याचे कारण म्हणजे डॉक्टर शीतल आमटे- करजगी यांनी केलेली आत्महत्या.
– प्रमोद कोलप्ते
कुष्ठरोग्यांच्या सेवेत अखंड हयात घालविणारे त्यांचे जीवन आनंदमय करणारे आनंदवनाचे निर्माते व थोर समाजसेवक बाबा आमटे यांची नात व डॉक्टर विकास व भारती आमटे या दाम्पत्याची कन्या डॉक्टर शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्र् हळहळला. इतक्या मोठ्या घराण्याचा वारसा लाभलेल्या व स्वतः पेशाने डॉक्टर असलेल्या आनंदवनाच्या सीईओ डॉक्टर शीतल यांनी आत्महत्या करण्याइतके टोकाचे पाऊल का उचललं? असं नेमकं काय झालं? या प्रश्नांची उत्तरं आपल्या सर्वांना पडली असतील. पण यांचं उत्तर आज या घडीला तरी मिळणं कठीण आहे.
अलिकडेच डॉक्टर शीतल आमटे-करजगी यांनी समाज माध्यमांवर एक व्हिडिओ क्लिप जारी करून आनंदवनाच्या विश्वस्तांवर काही आरोप केले होते. त्यानंतर सदर क्लिप समाज माध्यमांवरून काढण्यात आली होती. या आरोपांच्या अनुषंगाने डॉक्टर विकास, भारती आमटे व त्यांचा भाऊ यांनी एक संयुक्त निवेदन जारी करीत या आरोपात तथ्य नसल्याचं सांगितलं होतं व डॉक्टर शीतल या नैराश्य ग्रस्त असल्यानेच त्यांनी असे आरोप केल्याचे त्यांच्या या निवेदनात म्हटले होते.
सत्य नेमकं काय आहे हे कदाचित बाहेर येईल किंवा अन्य प्रकरणाप्रमाणे येणारही नाही. पण त्यांची ही आत्महत्या अतिशय दुर्देवी आहे हे मात्र नक्की. आयुष्य फार सुंदर आहे व त्याचे मोल खूप आहे. प्रत्येकाने ते आपल्या परीने जगावे हे जरी खरे असले तरी त्याचा शेवट असा दुर्देवी नसावा. कारणे काहीही असोत पण आत्महत्येचा मार्ग निवडणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे हे ही खरं आहे.
सध्याच्या आपल्या धकाधकीच्या जीवनशैलीत अनेकांना नैराश्याने ग्रासलेले असते. वरकरणी व्यक्ती समाधानी वाटत असली तर त्याच्या अंतर्मनात एक प्रकारचे द्वंद्व चालू असते. या द्वंद्वावर जो जिंकतो तो आत्महत्येच्या विचारपासून परावृत्त होतो पण जो हरतो तो मृत्यूला अगदी आनंदाने कवटाळतो.
डॉक्टर शीतल आमटे या दुसऱ्याला (समाजाला) देणाऱ्यांपैकी होत्याच व त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे परोपकार,मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा हे आपल्या कृतीतून दाखवून देणाऱ्या बाबा आमटे या महामानवाच्या घरातील त्या होत्या. ज्या घराण्याच्या तीनही पिढ्यांनी दीनदुबळे, रंजले गांजले यांच्या जगण्याला अर्थ दिला त्या घराण्यातील डॉक्टर शीतल आमटे यांनी हा मार्ग पत्करावा हे कुणालाही रुचणारे नाही आणि म्हणूनच त्यांचं जाणं हे जीवाला घोर व मनाला चटका लावून जाणारं आहे.