या चिमण्यांनो परत फिरा…
आज २० मार्च जागतिक चिमणी दिवस. एक घास चिऊचा एक घास काऊचा असे म्हणत लहानग्यांना आई घास भरवते. पूर्वी अंगणात धान्य निवडले जायचे व घराच्या कौलारू भागातील घरट्यातून चिमण्या चिवचीवाट करत पटपट येऊन पाखडलेले धान्य टिपत असत. परंतु आता हे चिऊ काऊ म्हणजेच चिमण्या व कावळे शहरात दिसेनासे झाले आहेत. त्यासाठी विविध कारणे सांगितली जातात. परंतु चिमण्यांचे प्रमाण कमी होण्यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांचा नैसर्गिक अधिवास असणाऱ्या जागा आता आधुनिकीकरणामुळे नष्ट झाल्या आहेत.
पूर्वी फोटो फ्रेमच्या मागे, गच्चीच्या पाण्याच्या पाईप मध्ये, कौलारू घरांच्या कौलं मध्ये चिमण्यांची घरटी असायची. आता या कोणत्याही गोष्टी राहिल्या नाहीत. चिमणी हा निसर्ग साखळीतील सर्वात छोटा पक्षी आहे. छोट्या आकाराचे किडे, आळ्या, धान्याची कणसे हे त्यांचे मुख्य अन्न आहे. चिमण्या काडी-कचरा जमवून एखाद्या अडचणीच्या ठिकाणी अंडी घालतात. परंतु जर अंडी घातलेले ठिकाण सुरक्षित नसेल तरी सर्व अंडी खाली पडून फुटतात. त्यामुळे दरवर्षी लाखो चिमण्या अंड्यातच नष्ट होतात. असे जरी असले तरी छोट्या छोट्या छोट्या प्रयत्नांनी आपण चिमण्यांना त्यांचा नैसर्गिक अधिवास देऊन परत शहराकडे आणू शकतो.
त्यासाठी आपण सर्वांनी पुढील प्रकारे हातभार लावणे गरजेचे आहे. स्वसंरक्षणासाठी चिमण्या बाभळी तसेच काटेरी झुडपात लपतात. अशी काटेरी झुडपे शहर परिसरात नष्ट न होऊ देणे, पुठ्ठ्याचे खोके, लाकडी खोके, चार इंच व्यासाचे प्लास्टिक पाईपचे तुकडे या आधारे आपण चिमण्यांची घरटी बनवू शकतो. चिमण्यांसाठी तांदूळ, बाजरीची भरड तसेच राळे हे धान्य यासोबतच वाटीमध्ये पाणी घराच्या खिडकीत आपण जरुर ठेवू शकतो. यासाठी हल्ली अतिशय सुबक असे चिमण्यांची घरटी व ग्रेन फिडर वॉटर फिडर बाजारात उपलब्ध आहेत.
आपण प्रत्येकाने एक-एक चिमणीचे घरटे व एक धान्य फिडर जर आपल्या बाल्कनीमध्ये मध्ये लावले तर चिमण्या जरूर आपल्या घरट्याकडे परत फिरतील. आज जागतिक चिमणी दिन यानिमित्त आपण प्रत्येक जण एक घरटे व एक फिडर लावण्याचा संकल्प करूया. आपल्या पुढील पिढीला चिऊताई पूर्वीप्रमाणेच आपल्या बाल्कनीत दिसेल, अशी व्यवस्था करूया.
(नाविन्यपूर्ण घरटी तसेच फिडरसाठी संपर्क – हरेशभाई शहा- आमि जीवदया संस्था 9370228555)