औरंगाबाद ः कोविडयोद्धा म्हणून गौरवल्या जाणा-या डॉक्टरांमध्ये काही अपप्रवृत्तीहीचेही असतात. तसाच प्रत्यय औरंगाबादमध्ये पाहायला मिळाला. महापालिकेच्या कोरोना उपचार केंद्रात एका डॉक्टरनं कोरोनाबाधित महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर रुग्ण महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात घुसून डॉक्टरला बेदम चोप दिला. आरोपी डॉक्टरची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकारी नीता पाडळकर यांनी दिली आहे.
पदमपुरा इथल्या कोविड सेंटरमध्ये दोन दिवसांपूर्वी एक महिला रुग्ण दाखल झाली. या महिलेचा नंबर घेऊन एक आयुष डॉक्टर तिला सतत फोन करत होता. मंगळवारी (२ फेब्रुवारी) रात्री दोनला डॉक्टरनं महिलेला शरीरसुखाची मागणी केली. तिला गच्चीवर नेण्याचा प्रयत्न केला. महिलेनं आरडाओरड केल्यानंतर एकच गोंधळ उडाला. इतर कर्मचा-यांनी धाव घेऊन मध्यस्थी केली. घटनेची माहिती नातेवाईकांना मिळताच त्यांनी रुग्णालयात घुसून आरोपी डॉक्टरला बेदम मारहाण केली.
महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांना हा प्रकार कळाल्यानंतर त्यांनी तातडीनं प्रकरणाची चौकशी करून अहवाल गुरुवारपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले. या प्रकाराबाबत पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. महापालिकेकडून आरोपी डॉक्टरला बडतर्फ केल्याची माहिती आरोग्य अधिका-यांनी दिली. या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल, असं पाडळकर म्हणाल्या. मात्र पीडित महिलेनं कुठलीही तक्रार न दिल्यानं कायदेशीर कारवाई होऊ शकली नाही.