नाशिक – नोकरी गमावलेल्या कामगारांना ईएसआयसीने दिलासा दिला आहे. २१ मार्च २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या दरम्यान नोकरी गमावलेल्या कामगारांना तीन महिने आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. तशी माहिती सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी एल कराड यांनी दिली आहे.
डॉ. कराड यांनी सांगितले की, कोरोनामुळे लॉकडाउन झाल्यानंतर अनेक उद्योग व सेवा बंद करण्यात आले. त्यामुळे देशातील लाखो कामगारांचा रोजगार गेला. अशा बेरोजगार झालेल्या कामगारांना राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य देण्याची मागणी सीटू च्या वतीने देशाचे कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर सीटूच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील नोकरी गमावलेल्या ५७२ कामगारांचे अर्ज अटल विमीत व्यक्ती कल्याण योजनेअंतर्गत ईएसआयच्या शाखेकडे सादर करून आर्थिक सहाय्य देण्याची मागणी केली होती.
यासंदर्भात सीटूने राष्ट्रीय पातळीवर पाठपुरावा व आंदोलने केल्यानंतर २० ऑगस्ट रोजी ईएसआयसी कार्पोरेशनची ऑनलाइन व्हिडिओ बैठक होऊन यावर निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले आहे. या निर्णयानुसार २१ मार्च ते ३१ डिसेंबर या काळात ईएसआयसी चे सभासद असलेला कामगार बेरोजगार झालेला असल्यास त्यास त्याच्या मागील सरासरी उत्पन्नाच्या ५० टक्के वेतन तीन महिने देण्यात येणार आहे. यासाठी सदर कामगार ईएससायसीचा दोन वर्ष सभासद असला पाहिजे व त्याने कमीतकमी ७८ दिवसाचे ईएसआयसीची वर्गणी भरलेली असली पाहिजे, असे डॉ. कराड यांनी स्पष्ट केले आहे. देशभरात ईएसआयसीचे साडेतीन कोटी कामगार सदस्य आहेत. ज्या कामगारांचे वेतन २१ हजार दरमहा पेक्षा कमी आहे, असे कामगार सदस्य असतात. सुमारे चाळीस लाख कामगारांना या योजनेचा फायदा मिळू शकतो, असे डॉ. कराड यांनी सांगितले आहे.