आकाशवाणीच्या नवी दिल्लीतील मुख्यालयातील ज्येष्ठ निवेदक मिलिंद देशपांडे यांचा पंडित जसराज यांची महती सांगणारा हा विशेष लेख. त्यांच्याच शब्दात…
—
पंडित जसराज गेल्याची बातमी आली तेव्हा मी आकाशवाणीत ड्युटीवर होतो.
हळूच मनाच्या अथांग डोहात डोकावून बघितलं आणि एक तेजोमय तरंग उमटताना दिसला आणि मन भूतकाळात गेलं. २०१४ ची गोष्ट आहे ही, आकाशवाणीत महिन्यात एका शुक्रवारी एखाद्या दिग्गज कलाकाराला आमंत्रित केलं जायचं आणि मनसोक्त गप्पांची मैफिल रंगायची. त्या दिवशी पण मैफल अशीच रंगली, निमित्त होते पंडित जसराज.
आपण म्हणतो ना की एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्वच असं असतं की त्याच्या येण्यानंच एक जादुई वातावरण निर्माण होतं. मला आजही आठवतंय आम्ही सगळे पंडितजींची वाट बघत स्टुडिओत बसलो होतो. ते आले हसतमुखानं. सर्वांना नमस्कार केला आणि तिथेच त्यांनी आपल्या निरागस हास्याने मैफिल जिंकली.
गोरापान रंग, पांढराशुभ्र सदरा, पांढरं जॅकेट, पांढरंशुभ्र धोतर, मानेपर्यंत रूळलेले चंदेरी किनार असलेले केस, गळ्यात रूद्रांक्षांची माळ, हातातल्या बोटातील अंगठ्या आणि जगाला सहज जिंकणारं ते मोहक हास्य. मी तर बघतच बसलो होतो. गप्पा सुरू झाल्या आणि बोलता बोलता ते हैदराबादला पोचले आणि लहानपणी नामपल्ली पासून ते आणि त्यांची भावंडं टांग्यात बसून कसा सैरसपाटा (हा त्यांनी वापरलेला शब्द) करायचे याचं वर्णन केलं.
ते म्हणाले की, ‘हैदराबाद मे जो दिन बितायें वो कभी भूल नही सकता’. थोड्या वेळानं गप्पांची मैफल संपली, सगळेजण पंडितजींना भेटत होते, मी पण पुढे गेलो गुडघे टेकवले आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. मी हात जोडून उभा होतो आणि ते माझ्या कडे बघून हसले, इतकं प्रसन्न हास्य होतं की मी मंत्रमुग्ध होऊन गेलो होतो. मी त्यांना म्हटलं की, ‘पंडितजी, आज आप मुझे भी आपके साथ हैदराबाद लेकर गये’, आणि त्या एवढ्या मोठ्या कलाकारानं चक्क माझे दोन्ही हात हातात घेतले. (आत्ता हे लिहिताना पण माझं मन रोमांचित झालं आहे) आणि म्हणाले की, ‘आप भी हैदराबाद के है? हम तो हमारा बचपन और वो दौर कभी भूल नहीं सकते’.
त्यानंतर ते माझ्याशी पाच ते सात मिनिटं बोलत होते. हैदराबाद विषयी ते इतकं भरभरून बोलत होते की जणू थोड्या वेळाने मला म्हणाले असते की ‘चलो एक सैरसपाटा करके आते है हैदराबादका’ आणि मी जणू त्यांच्या अगदी जवळचा मित्र आहे असं ते मला वागवत होते.
एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की केवळ गायक किंवा कलाकार म्हणून हे लोक महान नाहीत, तर अतिशय सुंदर विचार आणि संस्कार यामुळे हे लोक लोहचुंबका प्रमाणे अनेकांना आपल्याकडे आकर्षित करतात. मनावर गारूड घालणं काय असतं याचा मला त्या दिवशी प्रत्यय आला.
तो दिवस माझ्या आयुष्यातला अत्यंत अविस्मरणीय अनुभव होता. मनाच्या एका कप्प्यात मी तो अलवारपणे जपून ठेवलाय आणि आजही तुमच्या आठवणींनी गतकातर झालोय.
आकाशवाणीनं मला खूप आनंद दिला, एकापेक्षा एक महान लोकांच्या भेटी घडवून दिल्या.
पंडितजी तुमचा आवाज तुमची गायकी माझ्या मनात कायम ताजी राहणार आहे. तुम्ही जो आनंद दिला त्यासाठी शत शत प्रणाम आणि भावपूर्ण आदरांजली.
आज देवांच्या दरबारी मैफल सजवण्यासाठी तुमचे बाकीचे मित्र पायघड्या घालून तुमची वाट बघत असतील.
जय हो!
– मिलिंद देशपांडे, आकाशवाणी, नवी दिल्ली