नवी दिल्ली – बॉलिवूडसह तामिळ, तेलगू आणि कन्नड चित्रपटसृष्टीत जवळपास १५० चित्रपटांमध्ये आपला कसदार अभिनय दाखवणाऱ्या अभिनेत्री रती अग्निहोत्री यांचा आज साठावा वाढदिवस. कुटुंबीयांसोबत आनंदाने आपला वाढदिवस साजरा करणाऱ्या रती अग्निहोत्री यांना लग्नानंतर घरगुती हिंसाचाराचा त्रास होत होता, हे अनेकांना माहीत नसेल. सार्वजनिक जीवनात एक यशस्वी अभिनेत्री अशी ओळख असली तरी वैयक्तिक आयुष्यात मात्र त्यांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागले. हा त्रास इतका वाढला की, शेवटी त्यांनी पोलिसात जाऊन तक्रार केली.
करिअर अत्यंत जोमात असताना रती अग्निहोत्री यांनी अनिल वीरवाणी या व्यावसायिकाशी लग्न केलं. पण लग्नानंतर त्यांच्या पतीने त्यांना खूप त्रास दिला. त्यामुळे घरगुती मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार घेऊन एका रात्री त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. आणि या त्रासाची कल्पना दिली. आपण आपल्या मुलाचा विचार करून हा त्रास सहन केल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी त्यांच्या मुलानेच या त्रासातून बाहेर येण्यासाठी रतिला मदत केली.
लग्नानंतर रतीने अभिनयाला रामराम ठोकला होता. मात्र, काही वर्षांनी त्यांनी पुन्हा अभिनय करायला सुरुवात केली. मात्र त्यानंतर त्यांनी मुख्य भूमिका सोडून सहाय्यिकेची भूमिका करण्यास सुरुवात केली.
रती यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यामुळे वयाच्या १० व्या वर्षीच त्यांनी सर्वप्रथम मॉडेलिंग केले. शाळेतही अनेक नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. एकदा त्यांच्या शाळेत स्नेहसंमेलनाला चित्रपट निर्माता भारती राजा आले होते. त्यांना रती यांचा अभिनय इतका आवडला की, त्यांनी लगेच चित्रपटाची ऑफर दिली. आणि १६ व्या वर्षी एका तामिळ चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर रती यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले.