याहू मेल आता बरेच मागे पडले असले आणि जीमेल व मायक्रोसॉफ्ट आऊटलूक (आधीचे हॉटमेल) पुढे निघून गेले असले तरी माझ्यासारखे काही जण अजूनही याहू मेल वापरतात. एकतर जीमेल व मायक्रोसॉफ्ट आऊटलूक ग्राहकाला प्रत्येकी १५ जीबी साठवणक्षमता फुकटात देतात. तर याहूमध्ये तब्बल एक टीबी म्हणजे एक हजार जीबी फुकटात मिळतात. बाकी जीमेल व मायक्रोसॉफ्ट आऊटलूक एवढ्या सुविधा नसल्या तरी याहूमध्ये इतर खूप चांगल्या सुविधा आहेत, असे मला वाटते. यातल्या दोन सुविधा याहू १५ डिसेंबर २०२० व एक जानेवारी २०२१ रोजी बंद करत आहे.
दि. १५ डिसेंबरला याहू ग्रुप्स बंद होत आहेत. एकेकाळी हे ग्रुप्स खूप लोकप्रिय होते. परंतु आता त्यांचा वापर कमी झाला आहे. म्हणून याहूने १२ ऑक्टोबर २०२०पासून नवे ग्रुप करायला बंदी घातली आणि १५ डिसेंबरला आहेत ते ग्रुपसुद्धा बंद होतील.
दुसरी सुविधा Auto Forwarding ची. याहूमधून दुसऱ्या मेल आयडीवर मेल फॉरवर्ड करण्याची सुविधा होती. वेगवेगळ्या इमेलमधून एकाच इमेल आयडीत सगळे मेल फॉरवर्ड करून सुरक्षित ठेवण्याची (माझ्यासह) अनेकांना सवय होती. ही Auto Forwarding सुविधा एक जानेवारी २०२१ पासून बंद होणार आहे. सर्वानी वेळीच सावध होण्याची गरज आहे. नाहीतर आपले मेल फॉरवर्ड होत आहेत असे वाटून निर्धास्त राहिलात तर पंचाईत होईल.
अर्थात तरीही मी याहू मेल वापरणे चालू ठेवणार आहेच!
(ज्येष्ठ पत्रकार अशोक पानलवकर यांच्या नेटभेट या ब्लॉगवरुन साभार)