पुणे – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पुणेकरांना मोठा सुखद धक्का दिला. पुणे दौऱ्यावर असलेल्या देशमुख यांनी पोलिस आयुक्तालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी थेट कंट्रोल रुम गाठले. याठिकाणी येणाऱ्या फोन स्वतः देशमुख यांनी घेतले. हॅलो. नमस्कार मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय. आपली तक्रार काय आहे, अशी विचारणा त्यांनी केल्याने तक्रारदार पुणेकरही अवाक झाले. त्यानंतर केवळ तक्रार घेऊन गृहमंत्री थांबले नाही तर त्या त्या पोलिस स्टेशनलाही त्यांनी तत्काळ कळविले. गृहमंत्र्यांनी यावेळी तक्रारदारांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.
कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यासाठी गृहमंत्री पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी गृहमंत्र्यांनी पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. नव्या वर्षानिमित्त त्यांनी केक कापून सेलिब्रेशन केले.