मुंबई – कोरोनाविरुद्धच्या लढ्यात भारत जगभरातील अनेक देशांना मदत करत आहे. भारताने आतापर्यंत अनेक देशांना कोव्हीड-१९ व्हॅक्सीनचे जवळपास ५५ लाख डोसेज पाठविलेले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले की कोरोनावर मात करण्यासाठी इतर देशांना मदत करणे भारताचे कर्तव्य आहे. याशिवाय अनेक देशांचे प्रस्ताव भारताकडे प्रलंबित आहेत.
श्रीवास्तव यांनी सांगितले की, भारताने २० जानेवारीपासून आतापर्यंत अनेक देशांमध्ये व्हॅक्सीन पाठविले आहे. मैत्री टीका अभियानांतर्गत श्रीलंकेला पाच लाख व्हॅक्सीनचे डोसेज पाठविण्यात आले आहेत. यापूर्वी भुतानला १.५ लाख, मालदिवला १ लाख, नेपाळला १० लाख, बांगलादेशला २० लाख, सेशल्सला ५० हजार, म्यानमारला १५ लाख, मॉरिशसला एक लाख डोसेज पाठविण्यात आले आहेत. ज्या देशांनी भारताकडे मागणी केली त्यांनाच ही मदत करण्यात आली आहे. आणखी काही प्रस्ताव प्रलंबित असून येत्या काळात त्यांनाही व्हॅक्सीन पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. सुरुवातीच्या टप्प्यात ज्या शेजारी राष्ट्रांनी भारताकडे मागणी केली आहे, त्यांना व्हॅक्सीन पाठविण्यात येत आहे. सोबतच इतर राष्ट्रांनाही पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. काहींना व्हॅक्सीन मिळाले देखील आहे. आतापर्यंत ब्राझील, मोरक्को आणि बांगलादेशला व्हॅक्सीन निर्यात करण्यात आले आहेत. आता साऊदी अरब, दक्षिण आफ्रिका, कॅनडा आणि मंगोलियाला व्हॅक्सीनचा पुरवठा होण्याची शक्यता आहे.