मुंबई – दिवाळीच्या निमित्ताने सर्व जण आपल्या ऐपतीप्रमाणे काही ना काही खरेदी करतात. त्यातच साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या धनत्रयोदशीच्या दिवशी बहुतांश जणांचा खरेदीकडे कल असतो. दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी एका झटक्यात दिवाळीची मोठी खरेदी केली आहे. झुनझुनवाला यांची कंपनी रेअर एंटरप्रायझेसने इंडिया बुल्स रिअल इस्टेट या कंपनीचे तब्बल ५० लाख इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत. या बदल्यात इंडिया बुल्स कंपनीची रेअर एंटरप्रायझेसला १.१ टक्क्यांची भागीदारी मिळाली आहे. ओपन मार्केट ट्रान्झेक्शनच्या माध्यमातून हा व्यवहार झाला आहे. रेअर इंटरप्रायझेसने ५७.७३ रुपये प्रति शेअर या दराने शेअर खरेदी केले आहेत. त्यामुळे ५० लाख शेअर्सची किंमत २८ कोटी ८६ लाख एवढी आहे. या व्यवहारामुळे शेअर बाजारात १२ टक्क्यांनी तेजी आली आहे.