नाशिक – राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी मोठा आदर्श निर्माण केला आहे. कोरोनासारख्या गंभीर आजारावर मात केल्यानंतर भुसे यांनी थेट शेतीचा बांधच गाठला. कारण, गेल्या काही दिवसात आलेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष बागांसह शेतपिकांचे आतोनात नुकसान केले आहे. ही बाब भुसे यांना कळल्यानंतर त्यांनी कोरोनातून बरे होताच थेट शेतपिकांच्या नुकसानीचा पाहणी दौरा सुरू केला. चांदवड, देवळा या तालुक्यातील द्राक्ष बागांची पाहणी भुसे यांनी मंगळवारी केली. यावेळी आमदार डॉ. राहूल आहेर हे सुद्धा त्यांच्या समवेत होते. त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. तसेच, द्राक्ष बागांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच या नुकसानीचा अहवाल सरकारला सादर करण्याचेही त्यांनी आदेश दिले. शेतकर्यांना सर्वतोपरी मदत करु, अशी ग्वाही भुसे यांनी शेतकऱ्यांना यावेळी दिली. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.