नवी दिल्ली : रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले खेळाडू खेळतात. या टी २० लीगचे आयोजन यंदा छत्तीसगडमधील दुर्ग येथे करण्यात आले हाेते. ५ ते २१ मार्च दरम्यान खेळवल्या गेलेल्या या मालिकेमध्ये सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील इंडिया लिजेंडने श्रीलंकेच्या टीमला हरवत विजेतेपद पटकावले. मात्र, या सिरीजनंतर येथील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
रुग्णांमधील ही वाढ चिंताजनक असल्याने याबाबत चौकशी करण्यासाठी केंद्र आणि राज्याचे पथक दुर्ग येथे पोहोचले. या पथकातील सदस्यांनी स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन कोरेाना वाढण्याची कारणे आणि त्यावर करण्यात येणारे उपाय, याबाबत चर्चा केली. रायपूर येथे आयोजित रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज, या सिरीजदरम्यान कोरोना नियमांचे झालेले उल्लंघन, सार्वजनिक कार्यक्रम यांमुळे कोरोनाचा प्रसार वेगाने झाला. याशिवाय, महाराष्ट्रातूनही अनेक लोकांची तेथे ये – जा झाल्याने हे प्रमाण वाढल्याचा अंदाज आहे.
दिल्लीतील डॉ. एस.के. जैन, कोलकाताचे डॉ. अमित बारीक, रायपूर एम्सचे डॉ. सजल डे, एनसीडीसीचे डॉ. संदीप आदींचा या पथकात समावेश होता. कोरोना रोखण्यासाठी काय उपाययोजना सुरू आहेत, याबाबत या सदस्यांनी माहिती घेतली. तपासणीबाबत नाराजी व्यक्त करत तपासणी आणि लसीकरणाचा वेग वाढवण्याबाबत सांगण्यात आले. कंटेन्मेंट झोनमध्ये संपूर्णपणे बंदी करण्यासोबतच तेथे राहणाऱ्या सर्वांची कोरोना टेस्ट करून घेण्याचा सल्ला देण्यात आला. या पथकाने शंकाराचार्य कोविड रुग्णालयाची पाहणी केली.