नवी दिल्ली – द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर फोगट यांच्या तिसऱ्या मुलीचा बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी विवाह होऊ घातला आहे. आंतरराष्ट्रीय पहेलवान बजरंग पुनिया याच्यासोबत फोगट यांची कन्या संगीता फोगट लग्नबंधनात बांधली जाणार आहे. स्वतः संगीता देखील आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावाजलेली पहेलवान आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बलोली गावात अगदी साधेपणाने हा समारंभ साजरा होत आहे.
विशेष म्हणजे ही दोन्ही कुटुंबे हुंड्याच्या विरोधात असून, बजरंग शकुनाचा म्हणून केवळ १ रुपया घेणार आहे.
२५ नोव्हेंबरला हा विवाह होत आहे. त्यापूर्वीचे लग्नविधी करण्यात आले. केवळ जवळच्या नातेवाईकांना या लग्नसोहोळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.
या दोन्ही परिवाराच्या सहमतीने साखरपुडा आधीच करण्यात आला होता. आता लग्न साधेपणाने करण्याचा निर्णयही आम्ही मिळून घेतल्याचे संगीताचे वडील महावीर फोगट यांनी सांगितले. कोरोनामुळे जी नियमावली देण्यात आली आहे तिचे काटेकोरपणे पालन करण्यावर आमचा भर असेल असे सांगतानाच लग्नाच्या वरातीत केवळ २० माणसे असतील असेही ते म्हणाले.
दोन्ही मोठ्या बहिणींप्रमाणेच संगीताच्या लग्नातही सातच्या ऐवजी आठ फेरे घेतले जातील. आठवा फेरा हा मुलगी वाचवा, मुलगी शिकवा या उपक्रमाचा भाग आहे. आपली तिसरी मुलगी देखील या परंपरेचे पालन करणार असल्याचे फोगट यांनी अभिमानाने सांगितले.
संगीता आणि बजरंग हे दोघेही आपापल्या क्षेत्रात माहीर आहेत. बजरंग पुनियाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला अनेक पदके मिळवून दिली आहेत तसेच टोकियो ऑलिम्पिकसाठी देखील तो एक प्रमुख दावेदार मानला जातो. तर संगीता फोगटने राष्ट्रकूल स्पर्धांमध् ये रौप्य तर आशियाई खेळांमध्ये कांस्य पदक जिंकले आहे.