चाळीसगाव – ‘यश देशमुख अमर रहे’, जय हिंद, भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद या आणि अशा अनेक घोषणांनी पिंपळगावचा आसमंत निनादला. शहीद जवान यश देशमुख यांच्या पार्थिवावर होत असलेल्या अंत्यसंस्कारावेळी परिसरातील अनेक गावांमधून आलेल्या हजारो जनसागराच्या साक्षीने यश यांना अंतिम निरोप देण्यात आले. यावेळी अत्यंत भावुक आणि देशभक्तीमय वातावरण तयार झाले होते.
जम्मू-काश्मिरमधील श्रीनगर येथे असलेल्या भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी काही दिवसांपूर्वी हल्ला केला. त्यात यश दिगंबर देशमुख (पिंपळगाव ता. चाळीसगाव, जि. जळगाव) या जवानास वीरमरण प्राप्त झाले. यश यांचे वय अवघे २२ एवढे होते. देशमुख हे पॅरा मिल्ट्रीमध्ये भरती झाले होते. गेल्या तीन महिन्यांपासून ते जम्मू काश्मिरमध्ये कार्यरत होते. यश देशमुख यांना वीरमरण आल्याची माहिती पिंपळगाव येथील देशमुख कुटुंबियांना लष्कराच्यावतीने फोनद्वारे देण्यात आली होती. यश देशमुख यांचे पार्थिव श्रीनगरहून औरंगाबाद मार्गे चाळीसगावला आणण्यात आले. हजारोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत लष्करी इतमामात यश यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी देशमुख कुटुंबिय शोकसागरात बुडाले होते. त्यांना धीर देण्याचा सर्वांनी प्रयत्न केला. यश यांचे शौर्य वाया जाणार नाही. दहशतवाद्यांना योग्य ती अद्दल घडविली जाईल, असे देशमुख कुटुंबियाना यावेळी लष्करी अधिकाऱ्यांनी आश्वासित केले.
लष्करी इतमामातील अंत्यसंस्कारावेळचे हे व्हिडिओ
https://www.facebook.com/103446941470343/posts/157668182714885/