गुरुपुष्यामृत योग २०२१
यावर्षीचा पहिला गुरुपुष्यामृत योग २८ जानेवारी रोजी आहे. सकाळी ७ वाजून १६ मिनिटांपासून दिवसभर हा योग आहे. यावर्षी एकूण पाच गुरुपुष्यामृत योग आहेत. त्यात २८ जानेवारी, २५ फेब्रुवारी, ३० सप्टेंबर, २८ ऑक्टोबर, २५ नोव्हेंबर यांचा त्यात समावेश आहे. पंचांगाप्रमाणे अनेक प्रकारचे शुभयोग सांगितले गेलेले आहेत. यातील सर्वात शुभयोग म्हणजे गुरुपुष्यामृत योग मानला गेला आहे. यास अमृत सिद्धी योग सुद्धा म्हणतात. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र असते त्या दिवसाला गुरुपुष्यामृत योग होतो.
मुळातच गुरुवार हा शुभवार मानला गेलेला आहे गुरुचा वार असल्याने सर्व शुभ कार्य या दिवशी केले जातात. पुष्य नक्षत्र हे नक्षत्र मालिकेतील आठवे नक्षत्र आहे. हे देवगणी नक्षत्र आहे. याला राज नक्षत्र सुद्धा म्हणतात. अनेक राज्यांचे राज्यभिषेक हे गुरु पुष्य नक्षत्रावर झाल्याच्या नोंदी आहेत. देवालयांची प्राणप्रतिष्ठा यासाठी हा अमृत सिद्धी योग आहे. पुष्य नक्षत्राचा आराध्यवृक्ष पिंपळ आहे, म्हणून आजच्या दिवशी पिंपळ पूजन, पिंपळ प्रदक्षिणा अवश्य करावी.
पुष्य नक्षत्र हे अग्नीतत्वाचे असल्याने त्यादिवशी होम-हवन यास विशेष महत्त्व आहे. नवीन खरेदी करणे, कोणत्याही गोष्टीचा शुभारंभ करणे, नवीन संकल्प करणे, नूतन वास्तू प्रवेश यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. पौष पौर्णिमेला तिन्ही सांजेच्या वेळी पूर्व आकाशात पुष्य नक्षत्र दर्शन घेणे हे लाभकारक असते, अशी मान्यता आहे. कर्क राशी मध्ये येणारे हे पुष्य नक्षत्र ज्या तारकापुंज मुळे बनते त्यातील प्रभास, मधुचक्र, खरं, पुष्यतारा हे सर्व तारे अतिशय प्रखर व तेजपुंज आहेत. त्यामुळे पुष्य नक्षत्र आकाशात तेजस्वी दिसते.
परोपकारी वृत्ती, धैर्य, शौर्य, बेडरपणा, दिलदारपणा, निर्विवाद नेतृत्व शक्ती हे पुष्या नक्षत्राच्या प्रभावाचे स्वभाव गुण आहेत. चार आणि आठ हे पुष्य नक्षत्राचे शुभ अंक आहेत. शनी हा पुष्य नक्षत्राचा स्वामी असून बृहस्पती ही त्याची आद्य देवता आहे. पुष्य नक्षत्राचा रंग लाल आहे. सरकारी अधिकारी, अमलदार, प्रगतिशील शेतकरी, हिरे माणिक व्यवसाय, परदेश संबंधी सर्व व्यवसाय, जल पदार्थ व्यवसाय, आभूषण हे या नक्षत्राचे व्यवसाय आहेत. हे पुरुष स्वभाव नक्षत्र आहे. पुष्कराज व मोती पुष्य नक्षत्र प्रभावाची रत्न आहेत. म्हणून या दिवशी या दोन्ही रत्नांच्या खरेदीस विशेष महत्त्व आहे. गुरूंचे पूजन, कुलदेवता पूजन, गुरू पारायण, गुरु नाम जप, दानधर्म, सुवर्ण खरेदी, शुभ्र वस्त्रांची खरेदी, शुभ्र वस्त्र धारण, चंदन टिळा आदी गोष्टींना या दिवशी विशेष महत्त्व आहे.