नाशिक – घरगुती गणेशोत्सवातील दीड दिवसाच्या गणपती मूर्तींचे संकलन करून “देव द्या, देवपण घ्या” या उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे. गोदावरीचे प्रदूषण थांबविण्यासाठी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने गेल्या ९ वर्षांपासून राबविण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समितीच्या स्वयंसेवकांनी मास्क लावत सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून या उपक्रमात सुरुवात करण्यात आली. तशी माहिती विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांनी दिली आहे.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती व त्यावर केलेले रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्यप्रसाधंनामुळे गोदावरीचे मोठया प्रमाणावर प्रदूषण होते. हे प्रदूषण थांबविण्यासाठी विद्यार्थी कृती समितीच्या माध्यमातून गेल्या सलग ९ वर्षांपासून “देव द्या, देवपण घ्या” हा उपक्रम राबविण्यात येतो. यंदाचे या उपक्रमाचे दहावे वर्ष आहे. गतवर्षी हजारो गणेश मूर्ती नाशिककरांनी देव द्या देवपण घ्या या उपक्रमांतर्गत विद्यार्थी कृती समिती कडे सुपूर्द केल्या होत्या. समितीकडे आलेल्या गणेशमूर्ती मंगलमय व पवित्र वातावरणात नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्याने कृत्रिम तलावात विधिवत विसर्जित केल्या जातात.
गोदावरी नदी व पर्यावरणाच्या रक्षणासाठी देव द्या देवपण घ्या या उपक्रमात नाशिककरांनी मोठया संख्येने सहभागी होऊन गोदावरीचे प्रदूषण थांबविण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन करण्यात आले आहे. घरगुती गणेशोत्सवातील दिड दिवसांच्या गणपती संकलनासाठी वैष्णवी जोशी, राहुल मकवाना, विशाल गांगुर्डे, सागर बाविस्कर, रोहित कळमकर, तुषार गायकवाड, केदार कुरकुरे, ललित पिंगळे, योगेश निमसे, मंगेश जाधव, अतुल वारुंगसे आदींनी परिश्रम घेतले.
गोदापार्क येथे स्टॉल
चोपडा लॉन्स जवळील गोदापार्क येथे मंगळवारी (१ सप्टेंबर) रोजी सकाळी ८ ते १ या वेळेत हा उपक्रम राबविला जाणार आहे. स्वयंसेवक मास्क लावून आणि सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून मूर्ती स्विकारणार असल्याचे पगार यांनी सांगितले आहे.