नवी दिल्ली – यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसे ब्रिटनने कळविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः जॉन्सन यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रण दिले होते. त्याचा स्विकार जॉन्सन यांनी केला आहे.
यापूर्वी १९९३ मध्ये ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान जॉन मेजर यांनी प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी पद भूषविले होते. २०१४ मध्ये सत्तेवर आल्यापासून पंतप्रधान मोदी यांनी जगातील महत्त्वपूर्ण देशांच्या प्रमुखांना राजकीय अतिथी म्हणून बोलविले आहे. मोदी व जॉन्सन यांची २७ नोव्हेंबर रोजी कोविड संक्रमण, जागतिक अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि द्विपक्षीय संबंध या मुद्द्यांवर चर्चा झाली.
दूरध्वनीवर झालेल्या या चर्चे दरम्यान मोदी जॉन्सन यांना आमंत्रण दिले. जॉन्सन यांचा हा दौरा अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यात सध्या दोन महत्त्वाचे मुद्दे असून त्यावर गंभीर चर्चा होणे अपेक्षित आहे. इंडो पॅसिफिक सागरी क्षेत्रात सहकार्य आणि दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापाराच्या संधी यावर या भेटी दरम्यान चर्चा होण्याची संभावना आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे भारत भेटीवर आले होते. त्यानंतर कोरोनाच्या परिस्थितीमुळे कोणत्याही जागतिक नेत्याने भारताचा दौरा केलेला नाही. त्यामुळे कोरोना नंतर भारत भेटीवर येणारे जॉन्सन हे पहिलेच विदेशी राष्ट्रप्रमुख ठरतील.