नाशिक – अखेर सरकारी यंत्रणा हलली असून किसान रेल्वे अखेर लासलगावला थांबणार आहे. तसे रेल्वेने घोषित केले आहे. आता या रेल्वेला निफाड येथे थांबा द्यावा, अशी मागणी खासदार डॉ. भारती पवार यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.
शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी किसान रेल नुकतीच सुरु झाली आहे. त्यामुळे शेतीमालची वाहतूक होऊन शेतकऱ्यांचा माल देशभरातील विविध भागात विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. सध्या मोजक्याच रेल्वे स्थानकावरून शेतमाल जात आहे. पण किसान रेलचे थांबे मोठ्या प्रमाणात वाढले तर अजूनही शेतकऱ्यांचा माल भरपूर प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन खासदार पवार आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठविले होते. लासलगांव कृषि उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. येथून मोठ्या प्रमाणावर शेतीमाल हा देशातील नव्हे तर जगभरात विक्री साठी जातो. त्यामुळे किसान रेल्वेला अधिकृत थांबा लासलगांव येथे द्यावा, अशी मागणी करण्यात आली. अखेर त्याची दखल घेऊन लासलगांव स्टेशनवर थांब्याला हिरवा कंदिल देण्यात आला आहे. तसे पत्र डॉ. पवार यांना रेल्वे विभागाकडून प्राप्त झाले आहे. हा थांबा पुढील आठवड्यात अधिकृत होणार आहे.
दरम्यान, निफाड़ येथेही मोठ्या प्रमाणात शेतीमाल उपलब्ध असल्याने निफाडलाही थांबा मिळावा, अशी मागणी डॉ. पवार यांनी रेल्वे विभागाकडे केली आहे.