हैदराबाद :हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणूकीत एकूण दीडशे जागांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान होणार असून सध्या प्रचाराची रणधुमाळी अंतीम टप्प्यात आहे. विशेष म्हणजे रविवारी ( दि. २९ ) भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गृहमंत्री अमित शहा या निवडणुकीत जोरदार प्रचार करताना दिसले. स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर, तेजस्वी सूर्य, देवेंद्र फडणवीस यांनी आधीच प्रचार करून वातावरण निर्माण केले आहे. भाजपने एमआयएमला धोबी पछाड देण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे सहाजिकच हैदराबाद मनपाची निवडणूक राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठेची बनली आहे.
मनपा निवडणूक जिंकण्यासाठी टीम भाजपा जोरदार झुंज देत आहे. अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभांमुळे ही निवडणूक हाय प्रोफाइल झाली आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याचा दावा करणार्या भाजपला एका महानगरपालिका निवडणुकांची एवढी चिंता का आहे ? आता प्रत्येक निवडणुका गांभीर्याने घेण्याची भाजपला सवय झाली आहे. याची खरी कारणे जाणून घेतल्यास असे लक्षात येते की भाजपला देशभरात विशेषतः दाक्षिण भारतात अधिक जनाधार वाढवायचा आहे. हैद्राबाद मनपाच्या एकूण दीडशे नागरी जागांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मागील निवडणुकीत भाजपला अवघ्या चार जागा मिळाल्या आणि ओवेसींचा पक्ष एमआयएमला ४४ जागा मिळाल्या. यापुर्वी बिहार विधानसभेच्या निवडणुकीतही एमआयएमला पाच जागा मिळाल्यामुळे भाजपने असदुद्दीनच्या पक्षाला गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसात असे दिसते आहे की, भाजप नागरी निवडणुका राज्य सत्ता हस्तगत करण्याचे एक साधन मानते. हरियाणा नगरपालिका निवडणुकीत भाजपने करनाल, पानीपत, यमुनानगर, रोहतक आणि हिसार या पाच महानगरपालिका ताब्यात घेतल्या. यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या निवडणुकीत सत्ता गमावलेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्याचा फायदा भाजपाला झाला होता.