नवी दिल्ली – देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून या प्रादूर्भावास एक बाब कारणीभूत असल्याचा दावा भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेने (आयसीएमआर) केला आहे. मास्क न वापरल्यानेच कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याचे संस्थेने म्हटले आहे. त्यामुळे मास्क ही बाब किती महत्त्वाची आहे, हे यातून स्पष्ट होत आहे.
मास्क न वापरणाऱ्या बेजबाबदार लोकांमुळे कोविडचा संसर्ग वाढला असल्याचा दावा संस्थेने केला आहे. संस्थेचे महासंचालक बलराम भार्गव यांनी स्वतः ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव केवळ तरुण किंवा वृद्धांमार्फतच होतो असे नाही. तर, मास्क न वापरणाऱ्या तसेच शारीरिक अंतर न राखणाऱ्या बेजबाबदार व्यक्तींमुळेही होत असल्याचे भार्गव म्हणाले. सेरो सर्वेक्षण चाचणीचा दुसरा टप्पा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.