नवी दिल्ली ः कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात लसीकरणाच्या तिस-या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली. ज्येष्ठ नागरिकांसह विविध आजारांनी ग्रस्त नागरिकांना लस देण्यात येणार आहे. या मोहिमेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लस घेऊन केली खरी, पण वेगळ्याच कारणामुळे नेटिझन्सनं त्यांच्यावर टीका करत आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी सकाळी दिल्लीतल्या एम्समध्ये जाऊन लस घेतली. त्यानंतर नागरिकांना लस घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं. एम्समध्ये कोरोना लस घेतल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली. आपण देशाला कोरोनामुक्त करूया, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. पण लस घेताना मोदी यांच्या चेह-यावर मास्क नसल्याने अनेकांनी निशाणा साधला आहे. मोदींनी पोस्ट केलेल्या फोटोखाली मास्क नसल्याचा आक्षेप नोंदवला आहे.
पंतप्रधानांनी भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
पंतप्रधानांनी लस घेताना आसामी गमछा परिधान केला होता. लस टोचणा-या नर्स पुद्दुचेरीच्या होत्या. तर त्यांना सहाय्य करणा-या नर्स केरळच्या होत्या. आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, याकडे काही लोकांनी लक्ष वेधलं. त्यामुळे मोदी यांनी घेतलेली लस आगामी विधानसभा निवडणुका भाजपसाठी फायद्याच्या ठरणार का, असा प्रश्नही नेटिझन्सनी उपस्थित केला. तर दुसरीकडे मास्क न घातल्याबद्दल काहींनी संताप व्यक्त केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी लस घेताना मास्क लावल्याचा फोटो काही जणांनी शेअर केला आहे.