मुंबई – वेबसिरीज म्हणजे शिवीगाळ आणि अश्लिलता अशीच एक प्रतिमा झाल्याचे आता दिसते आहे. याचा समाजावर विपरीत परिणाम होत असल्याने हे योग्य नाही, असे म्हणत ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील जेठालाल अर्थात अभिनेता दिलीप जोशी यांनी वेबसिरीजवर निशाणा साधला आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी ही मते व्यक्त केली.
काळानुसार स्वतःत बदल घडवून आणायला हवेत हे मलाही मान्य आहे. पण त्यालाही काही मर्यादा हवी. पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करण्याच्या नादात आपण काय काय करतो आहोत याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, असे मला वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवीगाळ करणे, अर्वाच्य भाषेत बोलणे ही आपली संस्कृती आहे का, या गोष्टी तुम्ही तुमच्या घरी, आई-वडिलांसोबत करू शकता का?
या वेबसिरीजमध्ये अनेकदा चांगले विषय हाताळले जातात. पण ते ज्या पद्धतीने सादर केले जाते ते योग्य आहे का, याचा विचार करायला हवा. आपली संस्कृती उदात्त आहे. पश्चिमेकडील लोक आपल्या संस्कृतीचे अनुकरण करू पाहतात, त्याचे कौतुक करतात. आणि आपण आपल्याकडे काय दाखवतो याचा विचार व्हायला हवा. अशाप्रकारे अपमानजनक भाषा वा परणाऱ्या समाजाची निर्मिती आपल्याला करायची आहे का, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
शिवीगाळ आणि अश्लिलता याशिवायही चांगल्या दर्जाचे काम निश्चित होते हे सांगताना त्यांनी हृषीकेश मुखर्जी, राज कपूर तसेच श्याम बेनेगल यांचे उदाहरण दिले. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका असून यात मध्यमवर्गीय लोकांचे आयुष्य सुंदररित्या दाखवले आहे.