नवी दिल्ली – इंटरनेटच्या या जमान्यात गुगलवर आपण एवढे अवलंबून आहोत की, काही काळ जरी या सेवा मिळाल्या नाहीत, तर आपल्याला काय करावे हे सुधरत नाही. सोमवारी (१४ डिसेंबर) संध्याकाळी असेच काहीसे घडले. युट्यूब, जी-मेल, गुगल मॅप, गुगल ड्राईव्ह या गुगलच्या सर्व सेवा जगभरात अचानक ठप्प झाल्या. यामुळे एकच गोंधळ उडाला. काही प्रसारमाध्यमांनी या सेवा अचानक बंद होण्यामागे सायबर हल्ल्याची शक्यता वर्तवली. त्यामुळे या माध्यमातून बँकांचे व्यवहार करणाऱ्यांचे धाबे दणाणले. पण, अशा प्रकारचा कोणताही सायबर हल्ला झाला नसल्याचे गुगलने स्पष्ट केले आहे.
गुगलने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, भारतीय वेळेनुसार सोमवारी संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास ऑथेंटिकेशन सिस्टीम आऊटेजचा प्रश्न निर्माण झाला. यामुळे जवळपास पाऊण तास गुगलच्या सेवा ठप्प झाल्या. इंटर्नल स्टोअरेज संबंधी काही अडचणी निर्माण झाल्याने या सेवा बंद झाल्याचे गुगलचे म्हणणे आहे.
गुगलची टीम युझर आयडेंटिफिकेशन आणि डेटा स्टोरेजशी निगडित काही काम करत होती. तेव्हा काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने ४५ मिनिटे गुगल ठप्प झाले. तर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६.०२ मिनिटांनी ही अडचण दूर करण्यात आली. या दरम्यानच्या काळात, युझर्सना झालेल्या त्रासाबद्दल गुगलच्या प्रवक्त्याने दिलगिरी व्यक्त केली आहे. याचबरोबर भविष्यात पुन्हा असा त्रास होणार नाही, याचा भरवसा देखील आपल्या युझर्सना दिला आहे.