मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी आरोप होत असलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर प्रथमच त्यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली आहे. राठोड म्हणाले की, या सर्व प्रकरणात अतिशय घाणेरडे राजकारण करण्यात आले आणि येत आहे. यानिमित्ताने सोशल मिडियात माझी आणि बंजारा समाजाची बदनामी केली जात आहे. पुजा चव्हाण यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी, माझे कुटुंब आणि संपूर्ण बंजारा समाज सहभागी आहे. गेल्या ३ दशकापासून मी सामाजिक व राजकीय कार्य मोठ्या प्रमाणात करीत आहे. मला उद्ध्वस्त करण्याचा काही जणांचा कट आहे. आजपर्यंत जे काही सांगितलं किंवा दाखविले गेले त्यात कुठलेही तथ्य नसल्याचे राठोड यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. तसेच, आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
राठोड पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे चौकशीतून खरे सत्य बाहेर येणार आहे. मी हात जोडून विनंती करतो की कुणीही माझी किंवा माझ्या कुटुंबाची बदनामी करु नये, असे आर्जवही राठोड यांनी केले आहे. या सर्व प्रकरणाची निष्पष्क्ष चौकशी व्हावी आणि सत्य बाहेर यावे म्हणून मी राजीनामा दिल्याचे राठोड यांनी स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण
बीडमधल्या परळीतल्या सोशल मीडियावर प्रसिद्ध पूजा चव्हाण (वय २२) हिनं पुण्यात ८ फेब्रुवारीला इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. पूजा इंग्लिश स्पीकिंग कोर्स करण्यासाठी पुण्यात आली होती. वानवडी इथल्या हेवन पार्कमध्ये ती चुलत भाऊ आणि मित्रासोबत राहात होती. सोशल मीडियामध्ये विशेषतः टिकटॉक अॅपवर ती प्रसिद्ध होती. याप्रकरणी महाविकास आघाडीतले वनमंत्री संजय राठोड यांच्यावर भाजपकडून आरोप झाले. या प्रकरणाबाबत दहा ते बारा ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. त्यावरून राजकारण चांगलंच तापलं होतं.