लखनऊ – उत्तर प्रदेशातील किशनी तालुक्यात असलेल्या चीतायन गावाची रहिवासी असलेली जेष्ठ नागरिक कुंवरी उर्फ बिट्टन देवी (वय ८५) यांनी आपली साडेबारा बिघे म्हणजे जवळपास पाच एकर जमीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर करण्याचे ठरवले होते. तहसील कार्यालयात जाऊन त्यांनी अधिकाऱ्यांना कायदेशीर बाबी पूर्ण करून आपल्या वाटणीची जामीन मोदींच्या नावे करण्याचा हट्टच धरला होता. शेवटी अधिकारी वर्ग आणि कुटुंबातील सदस्यांनी समजून काढल्यावर बिट्टन देवी यांनी आपला विचार बदलवला.
खरे म्हणजे बिट्टन देवी यांना तीन मुले आहेत. सुना आणि नातवंडे सुध्दा आहेत. मात्र त्यांचे पती पुरणलाल यांच्या मृत्यू नंतर विगत पाच वर्षांपासून मुलगे आणि सुना यांच्या वागणुकीवर त्या नाराज झाल्या होत्या. बिट्टन देवींच्या मते मुले आणि सुना त्यांची काळजी घेत नाहीत. त्यांना जेवायला सुद्धा देत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे सुरु असलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या भरवशावर त्यांना गुजराण करावी लागते. यामुळे आपल्या पोटच्या मुलांपेक्षाही अधिक पंतप्रधान मोदींवर त्यांचा विश्वास आहे. म्हणूनच आपल्या वाटणीला आलेली सगळी जमीन त्यांना मोदींच्या नावे करायची आहे.
आईचा हा इरादा माहिती झाल्याबरोबर कुटुंबामध्ये एकच हल्लकल्लोळ माजला. सार्वजण आईची समजूत काढून तिची सेवा करू लागले. दुसऱ्या दिवशी सुद्धा बिट्टन देवी मात्र आपल्या निर्णयावर कायम होत्या. शेवटी त्यांच्या तिन्ही मुलांनी एसडीओ राम सकल मौर्य यांची भेट घेतली आणि आपल्या आईची मानसिक स्थिती बिघडल्याचे सांगितले. तिसऱ्या दिवशी (शुक्रवारी) सुद्धा बिट्टन देवी यांनी आपला हट्ट कायम ठेवला. शेवटी तहसीलदार सुधील कुमार यांनी घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि समजूत काढली. मुलांनी आईची क्षमा मागितली आणि गावातील लोकांनीही तिची समजूत घातली. यानंतर आपली जमीन आपल्या मुलांना वाटून देण्यास त्या तयार झाल्या. तहसीलदार यांनी गावातील प्रतिष्टीत लोकांपुढे बिट्टन देवी यांचे बयान घेतले तसेच त्यांच्या तिन्ही मुलांना आईची काळजी घेण्याचे बजावले.