मुंबई – ब्रिटनमधील कडक लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या अभिनेत्री प्रियांका चोप्राचे उदाहरण ताजे असतानाच परफेक्शनिस्ट अशी ओळख असणारा अभिनेता आमीर खान हा मुंबईत मुलांशी विना मास्क क्रिकेट खेळताना दिसला. यामुळे सोशल मीडियावर तो चांगलाच ट्रोल होतो आहे.
कोरोनाच्या संकटात सध्या सगळेचजण आवश्यक ती काळजी घेत आहेत. सोशल डिस्टनसिंग, मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर किंवा हात धुणे या गोष्टी खबरदारी म्हणून केल्या जात आहेत. अशावेळी सेलिब्रिटी किंवा प्रसिद्ध व्यक्तींनी याचे पालन करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र असे होताना दिसत नाही, हे आमीर खानच्या उदाहरणावरून दिसते. मुलांसोबत क्रिकेट खेळतानाचा त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. यात तो फलंदाजी करताना दिसतो पण, विना मास्क. त्याचे चाहते त्याच्या या बेजबाबदारपणावर खुश नाहीत. सोशल मीडियावर तर त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. या मुलांसोबत त्याने फोटो देखील काढला आहे.
लॉकडाऊनचे नियम आता शिथील झाल्याने मनोरंजन क्षेत्रातील अनेक रखडलेले प्रोजेक्ट्स पुन्हा सुरू झाले आहेत. यासाठी सेलिब्रिटी घराबाहेर पडताना दिसतात. तरीही मास्क लावणे अनिवार्य आहे. जर मास्क लावला नसेल तर दंड होऊ शकतो.