नवी दिल्ली – भूगर्भातील हालचालींमुळे भूकंप होतात, हे आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. तसेच अनेकदा समुद्रात भूकंप होतात हे देखील आपण जाणतो. पण, आता नवीन अभ्यासानुसार आपल्याला सर्वांना विनाशकारी भूकंपांचा सामना करावा लागू शकतो. आर्क्टिक भागातील वाढत्या उष्णतेमुळे हा धोका संभवतो.
आर्क्टिकमधील प्रेमाफ्रोस्ट आणि शेल्फ झोनमधून मिथेन वायू सर्वाधिक उत्सर्जित होतो. यांमुळे उष्णतेत वाढ होते. प्रेमाफ्रोस्ट म्हणजे असा भाग जो दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ बर्फाने आच्छादलेला असतो. तर शेल्फ झोन म्हणजे अशी बेटे जी पाण्यातच पण समुद्रसपाटीपासून थोड्या उंचीवर असतात. इथे पाण्याची खोली कमी असते.
या उष्णतावाढीबद्दल रशियातील मकाऊ इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स अँड टेक्नॉलॉजी येथील संशोधकांनी चिंता व्यक्त केली आहे. या भागातील हवामानात अचानक बदल होण्यामागील कारणांची विस्तृत चर्चा ‘जिओसायन्स’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या पेपरमध्ये करण्यात आली आहे. मात्र, तापमानात कधी कधी अचानक वाढ का होते, याची कारणे मात्र स्पष्ट करण्यात आलेली नाहीत.
जेव्हापासून संशोधकांनी आर्क्टिक बाबत अभ्यास करण्यास सुरुवात केली, तेंव्हापासून येथील उष्णतेत अचानकपणे दोन वेळा वाढ झाली आहे. गेल्या शतकाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दशकात पहिल्यांदा उष्णतावाढीचा अनुभव आला. तर दुसऱ्यांदा गेल्या शतकाच्याच आठव्या दशकात ही वाढ अनुभवली गेली. जी अजूनही थांबलेली नाही. तापमानात अकस्मात झालेला हा बदल भूगर्भातील हालचालींना वेग आणू शकतो, असे मकाऊ इन्स्टिट्यूट मधील संशोधक लिओपोल्ड लॉबकोवस्की यांचे म्हणणे आहे.