नवी दिल्ली – गेल्या नऊ महिन्यांपासून भारत-चीन दरम्यान चाललेल्या तणावानंतर चीननं पॅंगोंग जलाशयाच्या परिसरातून माघार घेण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही देशांच्या सैन्य करारानंतर दोन्ही देशांनी संवेदनशील ठिकाणावरून माघार घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. भारताच्या ताब्यातलं क्षेत्र बळकावण्याचा चीनचा प्रयत्न भारतानं कसा हाणून पाडला याबाबतची माहिती समोर आली आहे. लष्कराचे नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल वाय. के. यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी साधलेल्या संवादात माहिती दिली आहे.
काय होती रणनीती
कारगिल युद्धातले हिरो आणि वीरचक्रानं सन्मानित वा. के. जोशी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराचं लडाखमधील संपूर्ण ऑपरेशन चाललं. ऑपरेशन स्नो लिओपार्ड बाबत माहिती देताना त्यांनी सांगितलं की, या कारवाईत भारतीय लष्करानं आपला कोणताही भूभाग गमावला नाही, पँगोंग जलाशय परिसरातून चिनी सैन्याची माघार हा भारताचा विजय आहे.
पूर्व लडाखमधील पँगोंग जलाशयाच्या दक्षिण आणि उत्तर किनार्यावर भारतीय लष्कराच्या धडाकेबाज कारवाईनं चिनी सैन्य हैराण झालं होतं. भारतानं अनेक ठिकाणी चीनपेक्षा रणनीतिक आघाडी घेतली होती. त्यामुळे भारत माघार घेणार नाही, आपल्याला माघारी जावं लागेल याची जाणीव चीनला झाली होती. या काळात भारतानं या परिसातल्या महत्त्वाच्या शिखरांवर केलेला कब्जा हा सर्वात महत्त्वाचा ठरला.









