वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना आपल्या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच ते राष्ट्राध्यक्षांच्या खुर्चीत बसले तेव्हा कार्यकारी आदेशांवर अनेक स्वाक्षऱ्यां करण्यासाठी त्यांच्या टेबलावर एका सुंदर लाकडी पेटीत सोनेरी रंगाच्या नेव्ही क्रॉस सेंचुरी पेनांची एका ओळीत सुव्यवस्थित मांडणी केलेली होती. आता एक किंवा दोन पेन ऐवजी डझनभर पेन का? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. तर त्याची माहिती आणि परंपरा देखील रंजक आहे.
अमेरिकेत व्हाइट हाऊस संदर्भात अनेक आगळ्यावेगळ्या गोष्टी सांगण्यात येतात. प्रत्येक गोष्टीप्रमाणेच राष्ट्राध्यक्षांनी अनेक पेन वापरण्याची परंपरा अनेक दशकांच्या प्रथा, छंद आणि सरावातून सुरू झाली, असे सांगण्यात येते. कायद्याच्या एकाच पत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी प्रथम कोणत्या अध्यक्षांनी एका पेक्षा अधिक पेन वापरण्यास प्रारंभ केला हे स्पष्ट झाले नाही. परंतु इतिहासकारांच्या मते, ही परंपरा चार ते पाच दशकांपासून सुरू आहे. सदर पेन वापरल्यानंतर, ते सामान्यत: ऐतिहासिक कलाकृती म्हणून विशेष व्यक्तीला दिले जातात, असे लिंडन बी जॉनसन प्रेसिडेंशियल लायब्ररीचे संचालक मार्क लॉरेन्स यांनी स्पष्ट केले.
जॉन्सन यांनी १९६४ मध्ये नागरी हक्क कायद्यावर स्वाक्षरी केली तेव्हा त्याचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे त्यांनी महत्त्वाच्या कायद्यावर स्वाक्षरी करण्यासाठी किमान ७५ पेन वापरले होते. आणि ते पेन सर्व मान्यवरांना वाटून देण्यात आले. १९६४ मध्ये नागरी हक्क कायद्यावर स्वाक्षर्या करून राष्ट्रपती लिंडन जॉनसन यांनी मार्टिन ल्यूथर किंग (जूनियर ) यांना पेन भेट देऊन शुभेच्छा दिल्या. परंतु जॉनसन यांनी प्रत्येक पत्रासाठी नवीन पेन वापरलेले दिसते. सर्व पेन वापरण्याच्या प्रयत्नात स्वाक्षर्या काही वेळा जरा विस्तृत झाल्या, असे लॉरेन्स याने सांगितले . तसेच केनेडी यांनी एक वेळी स्वाक्षर्यामध्ये चार पेन वापरात आणली.
२०१० मध्ये राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केअर अॅक्टवर या नवीन कायद्यावर सही करताना २२ पेन वापरुन आधुनिकतेचे उदाहरण दिले. त्यापुर्वी ओबामा यांनी २००९ मध्ये जेव्हा फेअर वेतन कायद्यावर स्वाक्षरी केली, तेव्हाही त्यांनी सात पेन वापरल्या होत्या.