नाशिक – नाशिक महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दिली जाणारी वेतनश्रेणी ही शासन मान्य वेतनश्रेणी असल्याने सर्व अधिकारी कर्मचारी यांना विद्यमान वेतन श्रेणीवर सातव्या आयोग तात्काळ लागू करण्यात यावा अशी मागणी शिवसेना प्रणित म्युनिसिपल कर्मचारी – कामगार सेनेने आयुक्तांकडे निवेदनाव्दारे केली असून त्यात अल्टीमेटमही देण्यात आला आहे. या निवेदनावर कामगार सेनेचे अध्यक्ष प्रविण तिदमे यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, शिवसेना गटनेते विलास शिंदे, कामगार सेनेचे सरचिटणीस व सदस्यांच्या सह्या आहेत.
या निवेदनात आस्थापना परिशिष्टावरील सर्व पदे १०० पदे पदोन्नतीने भरावी, अनुकंपातत्त्वारील भरती २०१३ पासून पासून केलेली नाही. २०० च्या आसपास प्रकरणे असून ही नियुक्ती करावी, अंगणवाडीत काम करणा-या महिलांच्या मानधनात वाढ करावी अशा मागण्या केलेल्या आहे. त्याचबरोबर या निवेदनात या मागण्या एक महिन्यात पूर्ण न केल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. या इशा-यात आंदोलनाचे स्वरुपही सांगण्यात आले आहे. त्यात ११ जानेवारीला काळ्या फिती लावून प्रशासनाचा निषेध करणे, १८ जानेवारीला लेखणी बंद, या आंदोलनाची दखल घेतली नाही तर १ फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारण्यात येईल असे म्हटले आहे.