बँकॉक – सैन्यदलातील सैन्याच्या उठावाच्या भीतीने लष्करप्रमुखाने म्यानमारमध्ये एक वर्षाची आपत्कालीन स्थिती तथा आणीबाणी जाहीर केली आहे. यापूर्वी म्यानमार सैन्याने देशाच्या नेत्या आंग सॅन सू की यांना ताब्यात घेतले आहे.
नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसीचे प्रवक्ते म्यो न्यंट यांनी सांगितले की, म्यानमारच्या सैन्याने देशाचे प्रमुख नेते आंग सान सू की यांना ताब्यात घेतले असून सु की यांच्यासह अध्यक्ष विन म्यांट यांना राजधानी नेपिडो येथे नजरकैदेत ठेवले आहे. दरम्यान, म्यानमारच्या राजकीय पेचप्रसंगावर भारताची बारीक नजर आहे. यासंदर्भात भारताने कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यांनी घटनेवर लक्ष ठेवले आहे.
निवडणुकीतील घोटाळ्याच्या तक्रारी आल्यानंतर गेल्या आठवड्यात म्यानमारमध्ये तणाव निर्माण झाला होता, या घोटाळ्याच्या तक्रारींकडे लक्ष न दिल्यास सत्ता बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्यानमारचे सर सेनापती-सीनियर जनरल मिल ऑंग लैंग यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलताना सांगितले की, ‘देशात कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे न केल्यास कायदा रद्द केला जाऊ शकतो’. त्यांच्या या वक्तव्यानंतर म्यानमारमधील राजकारण तापले होते.
अनेक मोठ्या शहरांमधील रस्त्यांवर सैन्याची वाहने तैनात केल्यावर जनतेमध्ये भीतीचे वातावरण होते. दरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले की म्यानमारमधील घडामोडींविषयी त्यांना चिंता आहे.