यांगून – म्यानमारमधील सैन्यदलाच्या लष्करी हुकुमशाही विरोधात निषेधासाठी निदर्शकांनी गांधीगिरीचा मार्ग स्वीकारला आहे. सुरक्षा दलांशी संघर्ष आणि अटक टाळण्यासाठी त्यांनी कार आणि मोटरसायकलची हॉर्न वाजवून आणि पोस्टरच्या माध्यमातून निषेध सुरू केला आहे. देशभरात गेल्या १ फेब्रुवारीपासून सत्ताधारीच्या विरोधात सुरू झालेल्या निषेधात सुमारे २५० जणांचा मृत्यू झाला आहे.
म्यानमारमधील सर्वात मोठे शहर यांगूनच्या अनेक भागात निदर्शकांनी त्यांच्या मोटारी आणि मोटरसायकलची हार्न वाजविली. तसेच पश्चिम म्यानमारच्या मिंदाट शहरात, निदर्शकांनी रिकाम्या चौकासमोर अनेक पोस्टर्स लावली. त्यांच्यावर ‘सैन्य शासन अयशस्वी होईल’ अशा घोषणा लिहण्यात आल्या होत्या. तसेच देशातील दुसर्या क्रमांकाच्या मोठया शहरात मंडाले येथे नुकत्याच झालेल्या हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. रविवारी शहरातील हिंसाचारात चार जण ठार आणि अनेक जखमी झाले.
म्यानमारमधील निदर्शने चिरडण्याच्या प्रयत्नात लष्करी राजवटीच्या सैन्याने आंदोलकांवर गोळीबार देखील केला. युरोपियन युनियनने (ईयू) म्यानमारमधील सैन्य उठावात सामील असलेल्या उच्च अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. त्यांचा युरोपियन देशांचा प्रवास थांबविण्याबरोबरच मालमत्ता जप्त करण्याचेही पाऊल उचलले गेले आहे. युरोपियन युनियनचे परराष्ट्र व्यवहारप्रमुख जोसेफ बोरेल म्हणाले, आम्ही या सत्ताधीशात सामील झालेल्या ११ लोकांवर बंदी घालणार आहोत.