नेपिता – म्यानमारमधील सत्ताबदलाचा विरोध करण्यासाठी सातत्याने आंदोलने सुरू आहेत. निदर्शनांना विरोध तसेच आंदोलकांवरील करवाईनंतरही येथील आंदोलन थांबण्याची चिन्हे नाहीत. आता पोलीस आणि सरकारी कर्मचारीदेखील यात सहभागी झाले आहेत. बुधवारी निदर्शनांमध्ये काही हिंसाचार झाला नसल्याचे वृत्त आहे. पण, जखमी आंदोलकांना जेथे ठेवण्यात आले आहे, ते रुग्णालय लष्कराच्या ताब्यात असल्याचे समजते.
दरम्यान, आंग सॅन स्यू की यांच्या पक्षाच्या मुख्य कार्यालयावरही धाड टाकण्यात आली आहे.
म्यानमारमधील मोठी दोन शहरे यांगून आणि मंडाले यांच्यासह राजधानी नेपिता येथेही नागरिक आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. यात सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. केह प्रांतातील पोलिसांशी संबंधित एका गटाने देखील आंदोलनात सहभाग घेतला आहे. आम्हाला हुकूमशाही नकोय, अशी पोस्टर्स घेऊन ते फिरत आहेत. एकंदर सगळी परिस्थिती तसेच आंदोलनाची तीव्रता पाहता, कोणताही तोडगा निघणे अशक्य असल्याचे राजकीयतज्ज्ञांचे मत आहे.









