मुंबई – एअरटेल मोबाईल कंपनीने नवीन ग्राहक जोडण्याच्या स्पर्धेत सलग तिसऱ्या महिन्यात रिलायन्स जिओ ला मागे टाकले आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) च्या आकड्यांनुसार या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये सर्वाधिक ३७ लक्ष वायरलेस सब्सक्रायबर्स प्राप्त करत एअरटेल देशात आघाडीवर आहे. मागील महिन्यातील ग्राहक संख्येपेक्षा हा आकडा १.१२% अधिक आहे. या यादीत जिओ २२ लक्ष ग्राहकांसह दुसऱ्या स्थानी आहे तर व्होडाफोन- आयडिया यांची ग्राहक संख्या मागील महिन्याच्या तुलनेत ०.९% कमी झालेली आहे.
पोर्ट करण्याकडे कल
काही टेलिकॉम कंपन्यांच्या खराब नेटवर्कमुळे त्रस्त होऊन अनेक ग्राहकांचा कल आपला नंबर पोर्ट करण्याकडे आहे. नंबर पोर्टेबिलिटी रिक्वेस्टमध्ये सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात वाढ झाली आहे. सप्टेबर मध्ये ५ कोटी २० लक्ष लोकांनी मोबाईल पोर्ट केले होते तर ऑक्टोबरमध्ये ही संख्या ५ कोटी २९ लक्ष ६० हजार इतकी झाली. देशात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. यात जिओचे नंबर बंद करण्याची मोहीम सुरु केली गेली आहे. यामुळे येत्या काही महिन्यांत देशात मोबाईल नंबर पोर्ट करण्याच्या आकड्यांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आजही ग्राहकांच्या एकूण संख्येचा विचार केल्यास जिओ अजूनही आघाडीवर आहे. साद्यस्ठितीत जीओचे ४०६.३६ मिलियन ग्राहक आहेत तर एअरटेलचे ३३०.२९ मिलियन ग्राहक आहेत. आयडीया-वोडाफोनच्या ग्राहकांची संख्या २९२.८४ मिलियन इतकी आहे. याचबरोबर सर्वाधिक इनॅक्टिव्ह ग्राहकांच्या बाबतीतही जिओ आघाडीवर आहे. वोडाफोन-आयडीया याचा या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो तर एअरटेल तिसऱ्या क्रमांकावर आहे.