मुंबई – अतिवृष्टीमुळे व्होडाफोन आणि आयडियाचे नेटवर्क गायब झाले असून दिवसभरात राज्यातील मोबाईल ग्राहक प्रचंड हैराण झाले आहेत. सकाळपासून नेटवर्क नसल्याने शाळा तसेच ऑफिसचे काम खोळंबले असल्याचे ग्राहकांनी म्हटले आहे. तसेच हे नेटवर्क कधी येणार याबाबत अद्यापही साशंकता आहे. परिमाणी, नेटीझन्सने सोशल मीडियावर मोबईल कंपन्यांची यथेच्छ धुलाई केली आहे.
चक्रीवादळामुळे राज्यात अतिवृष्टी आहे. त्याचा परिणाम मोबाईल नेटवर्कवरही झाला आहे. याबाबत ग्राहकांनी कंपनीकडे तक्रार केली असता तांत्रिक अडचणीमुळे नेटवर्क नसल्याचे सांणण्यात आले. तसेच कस्टमर केअरला फोन केला असता समाधानकारक माहिती मिळत नसल्याने अनेकांनी सोशल मीडियावर याबाबत वाच्यता केली आहे.
फोन आणि मेसेज सुविधा काही काळ सुरु असते, मात्र इंटरनेटसेवा पूर्णपणे ठप्प झाल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. सध्या राज्यातील विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरु आहेत. अशा तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांचा आजचा पेपर होऊ शकलेला नाही. परिणामी पुणे विद्यापीठाने आजचा पेपर पुढे ढकलला आहे. इंटरनेट सुविधा बंद असल्याने घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे.