नवी दिल्ली – मोबाइलच्या अतिवापराने डोळ्यांचे नुकसान होते, त्यामुळे त्याचा वापर कमी करण्याचा सल्ला दिला जातो. ते शक्य नसेल तर किमान मोबाइलचा डार्क मोड सुरू करा, जेणेकरून त्याचा डोळ्यांना कमी त्रास होईल. आणि बॅटरीचीही बचत होईल, असे सांगितले जाते. पण या डार्क मोडचा खरंच काही फायदा होतो का, याची माहिती घेतली असता, समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. I fixit कडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
डार्क मोड म्हणजे काय?
पांढऱ्या किंवा लाईट कलरची स्क्रीन काळ्या रंगात आणणे म्हणजे, डार्क मोड. यात बॅकग्राऊंड डार्क आणि टेक्स्ट पांढरे असते. डार्क मोड सुरू करण्यासाठी सेटिंगमध्ये जाऊन डिस्प्ले आणि ब्राईटनेस सेटिंगचा पर्याय निवडा. तर काही ऍप्सचे स्वत:चा डार्क मोड असतो, त्यासाठी ऍप्सच्या सेटिंगमध्ये जाऊन ते बदलावे लागतात.
डोळ्यांना फायदा की तोटा
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, डार्क मोडमुळे तुमच्या डोळ्यांना त्रास होत नाही, हे खरे नाही. येल मेडिसिन ऑफथमोलॉजीचे नेत्रतज्ञ ब्रायन एम. डिब्रॉफ यांनी सांगितले की, मोबाइलमुळे डोळ्यांचे जे नुकसान होते, त्यापासून डार्क मोड वाचवू शकत नाही. डोळ्यांवरील ताण, डोकेदुखी किंवा डोळे कोरडे होणे असे त्रासही यामुळे कमी होत नाहीत. परंतु याने तुमच्या मॅक्युलाला कसलेही नुकसान होत नाही. आपल्या डोळ्यातील रेटिनाच्या मध्यभागी मॅक्युला असतो. आणि आपल्या दृष्टीसाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे.
बॅटरी बचत
डार्क मोडमुळे बॅटरीची बचत होते, हे काही प्रमाणात खरे आहे. मात्र, ज्यांच्या मोबाइलची स्क्रीन OLED आहे, अशाच मोबाइलना हा फायदा मिळतो. ज्यांच्या स्क्रीन एलइडी त्यांच्या बॅटरीला डार्क मोडने काहीच फरक पडत नाही. थोडक्यात, तुमची स्क्रीन कशी आहे, यावर डार्क मोड सुरू केल्याने बॅटरी वाचेल की नाही हे अवलंबून असते.
डार्क मोडचे फायदे
डार्क मोड मोबाइलचा प्रखर प्रकाश मंद करतो. यामुळे लवकर झोप येते. रात्री झोप येत नाही, म्हणून मोबाइल बघतो, असे सांगणाऱ्यांसाठी हे उपयोगी आहे. यामुळे जगरण होत नाही.