नवी दिल्ली – भारत सरकारने चालवलेल्या घरगुती उत्पादनांचा वापर आणि चीनविरोधी उत्पादन मोहिमेवर भर दिल्यामुळे दिवाळीपूर्वीचं चीनला मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान सुमारे ४२ हजार कोटी रुपयांचे आहे. वास्तविक पाहता दिवाळीच्या एक महिनाआधी तयारी आणि खरेदीला सुरवात झालेली आहे. यात चीन येथे तयार होणाऱ्या उत्पादनांना मोठी मागणी आहे, परंतु गलवान खोऱ्याच्या मुद्द्यानंतर सरकार आणि व्यापारी संघटनांकडून निरनिराळ्या योजना राबविल्या जात आहेत. देशांतर्गत तयार होणाऱ्या वस्तूंचा वापर करावा यासाठी शासन आग्रही असल्याने नक्कीच याचा फटका चीनला बसतो आहे.
दीपावलीच्या निमित्ताने प्रत्येकजण आपले घर तसेच कार्यालय सजवण्यासाठी चिनी वस्तू वापरतात. आता पूजेमध्ये वापरल्या जाणार्या वस्तूही चीनमधून येत असतात. मात्र, यंदा भारतीय वस्तू खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर असल्याने चिनी अर्थव्यवस्थेला याचा फटका बसणार आहे. लडाख, गालवान व्हॅली यासारख्या भागात चीनबरोबर चालणार्या वादामुळे चीनमधील वस्तूंवर भारतात बहिष्कार टाकला जात आहे असे मत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी व्यक्त केले आहे. दीपावलीच्या निमित्ताने अनेक प्रकारचे माल भारतात येतात. ज्याची मागणी देखील बर्यापैकी जास्त असते. फॅब्रिक, कापड, हार्डवेअर, फूटवेअर, गारमेंट्स, किचन उत्पादने, गिफ्ट आयटम, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, घड्याळे, ज्वेलरी, घरगुती वस्तू, फर्निचर, बर्निंग स्मोक लाइट्स, फर्निशिंग्ज आणि फॅन्सी लाइट्स , लॅम्पशाडेस व रांगोळी यासारख्या असंख्य वस्तू चीन कडून मागवल्या जातात. मात्र, यंदा प्रथमच भारतातील व्यावसायिकांच्या पुढाकाराने भारतात तयार होणाऱ्या वस्तूंच्या विक्रीला वेग आला आहे.
भारतीय वस्तूंच्या मागणीत वाढ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तूंच्या वापराबाबत सर्वसामान्यांमध्ये कायम प्रचार करत असतात. याच मिळालेल्या प्रोत्साहनामुळे भारतीय वस्तूंच्या मागणीत वाढ होतांना दिसते आहे. यावर्षी दिवाळीसाठी इलेक्ट्रिक बल्ब, सजावटीच्या मेणबत्त्या, भेट वस्तू, पूजेच्या वस्तू, चिकणमातीचे पुतळे आणि इतर वस्तू भारतीय कामगारांनी देशात तयार केले असून त्याच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी म्हटले आहे. खरेदीसाठी आलेले ग्राहक भारतीय बनावटीच्या वस्तूंची मागणी करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.