नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सविस्तर आणि गंभीर भाषण ऐकून प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न उपस्थित होत असेल, की त्यांचे भाषण कोण लिहितं? यावर किती खर्च येतो? भाषण लिहिणाऱ्या पथकात कोण कोण आहेत? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी माहिती अधिकारांतर्गत पीएमओ अर्थात पंतप्रधान कार्यालयाला माहिती मागण्यात आली. पंतप्रधान कार्यालयानं त्याला काय उत्तरं दिली, जाणून घेऊयात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवडणूक प्रचारातले भाषण असो, मन की बात, मुलांशी संवाद अथवा कोणत्याही जागतिक व्यासपीठाला संबोधित करणं असो. त्यांचे भाषण वेगळ्याच अंदाजातले असते. श्रोत्यांशी थेट संवादाची शैली त्यांना लोकांशी थेट जोडते. ते आपल्या भाषणांमध्ये आवश्यक संदेश देण्याबरोबरच टीका करणं किंवा गंभीर गोष्टी सहजतेने सांगण्यासाठी लोकप्रिय आहेत.
इंडिया टुडेनं पंतप्रधान मोदी यांच्या भाषणांबाबत माहिती घेण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाला माहिती अधिकारांतर्गत अर्ज केला होता. त्याला उत्तर देताना पीएमओनं सांगितलं, की पंतप्रधान आपल्या भाषणांना अंतिम स्वरूप स्वतः देतात.
ज्या प्रकारचा कार्यक्रम असतो, त्यानुसार त्यांना वेगवेगळ्या व्यक्ती, अधिकारी, विभाग, संस्था, संघटनांद्वारे माहिती दिली जाते. या माहितीच्या आधारे पंतप्रधान आपल्या भाषणांना अंतिम रूप देत ते स्वतः भाषण तयार करतात.
त्याबाबत उत्तर मिळाले नाही
अर्ज करताना पीएओ यांना विचारण्यात आलं, की पंतप्रधानांचे भाषण कोण लिहितं? या टीमध्ये किती लोक आहेत? भाषण लिहिण्यावर किती पैसे खर्च होतात? या प्रश्नांची उत्तरं पंतप्रधान कार्यालयानं दिले नाहीत.