नवी दिल्ली ः पूर्व लडाखच्या नियंत्रण रेषेजवळ चीनशी सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी प्रथमच फोनवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली. या चर्चेत पंतप्रधानांनी बायडन यांना निवडणुकीतील विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. क्षेत्रीय मुद्द्यांसह आपल्या प्राथमिकतांबाबत त्यांनी माहितीची आदान-प्रदान केली.
पंतप्रधान मोदी यांनी ट्विटवर सांगितलं, की आज मी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि निवडणुकीतील विजयाबाबत त्यांना शुभेच्छा दिल्या. आपापल्या प्राथमिकतांसह हवामान बदलाच्या मुद्द्यावर सहकार्यावर पुढे जाण्यासाठी सहमती झाल्याचं त्यांनी सांगितलं.
रणनितीक भागिदारी भक्कम करणार
पंतप्रधान मोदी यांनी सांगितल, की भारत-प्रशांत क्षेत्रातील शांतता आणि सुरक्षेसाठी आपली रणनितीक भागिदारी भक्कम करण्यासाठी तत्पर आहोत. पंतप्रधान मोदी यांनी जो बायडेन यांना यापूर्वीही मतमोजणी दरम्यान विजयाबद्दल ट्वि ट करून शुभेच्छा दिल्या आहेत.
चीनसोबत तणावाबद्दल चर्चा
भारत आणि अमेरिकेचे लष्करी जवान यांच्यात राजस्थानमध्ये युद्धअभ्यास सुरू असताना दोघांमध्ये ही चर्चा झाली आहे. डोनल्ड ट्रंप यांच्या कार्यकालात असलेले अमेरिकेचे चीनबाबतचे धोरण बदलणार नाही, असं बायडेन प्रशासनानं यापूर्वीच स्पष्ट केलं होतं. या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. चीनसोबत तणाव सुरू असताना या चर्चेमुळे भारत-अमेरिका संबंध अधिक भक्कम होण्याचे संकेत मानले जात आहेत.
चीनला कठोर संदेश
बायडेन प्रशासनाने यापूर्वीच स्पष्ट केले होते, की चीनने शेजारील देशांना धमक्या देण्याचे टाळावे. भारतीय नियंत्रण रेषेवरील परिस्थितीवर त्यांचे लक्ष आहे. अमेरिका रणनितीच्या रुपांने भारताचे हित जपेल, असा संदेश अमेरिकेने दिला होता.