मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या स्थळाला भेट देतात त्याचे महत्त्व आसपासच्या परिसरात तर माहिती असते पण देशभरातील लोकांना त्याची माहिती जाणून घ्यायची असते. अर्थात त्याबद्दल कमालीची उत्सुकता असते. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी दिल्लीतील रकाबगंज साहिब या गुरुद्वाराला भेट दिली आणि त्यानंतर त्याचा इतिहास वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा मोह आम्हाला आवरला नाही.
इतिहासात डोकावताना
संसद भवनच्या शेजारी असलेल्या रकाबगंज साहिबची निर्मिती १७८३ मध्ये झाली. याठिकाणी शिखांचे नववे गुरू तेग बहादूर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. गुरु तेग बहादूर यांचा जन्म १ एप्रिल १६२१ मध्ये अमृतसरमध्ये झाला होता. १६७५ मध्ये मुघल शासक औरंगजेबच्या सैन्याविरुद्ध लढताना ते चांदनी चौक येथे शहीद झाले होते. त्या ठिकाणी आज शीशगंज साहिब गुरुद्वारा आहे. औरंगजेबने गुरू तेगबहादूर यांना मुस्लीम धर्म स्वीकारण्यास म्हटले होते आणि त्यांनी नकार दिल्यामुळे त्यांचे शरीरापासून डोके वेगळे केले होते. या गुरुद्वाऱ्याला एतिहासिक महत्त्व आहे. त्यांचे शिष्य बंधू कापलेले डोके घेऊन नानकी येथे गेले, ते ठिकाण आज आनंदपूर साहिब म्हणून ओळखले जाते. औरंगजेबाने गुरू तेग बहादरू यांचे शरीर देण्यास नकार दिला आणि अंत्यसंस्कार करण्यावरही प्रतिबंध लावले. पण गुरू तेग बहादूर यांचा एक शिष्य लखी शाह बंजारा कसेबसे अंधारात आपल्या गुरूचे शरीर घेऊन पळाला आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. १७८३ मध्ये बाबा बघेल सिंह यांनी दिल्ली काबीज केल्यानंतर याच जागेवर गुरुद्वारा बांधला. त्याला रकाबगंज साहिब नावाने ओळखले जाते.
पंतप्रधानांचा अचानक दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक रकाबगंज साहिब गुरुद्वाराला रविवारी भेट दिली. त्याठिकाणी आदरांजली अर्पण केली. योगायोगाने शनिवारीच गुरू तेग बहादूर सिंग यांचे शहीद दिन होता. पंतप्रधानांनी रकाबगंज गुरुद्वारा येथील छायाचित्रे ट्वीटरवर पोस्ट केली. एवढेच नव्हे तर याठिकाणी येऊन प्रसन्न वाटल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
शेतकरी आंदोलनाची पार्श्वभूमी
राजधानी दिल्लीत पंजाबमधील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुद्वाराला भेट देऊन गुरू तेग बहादूर सिंग यांच्या समाधीवर माथा टेकला. या भेटीला शेतकरी आंदोलनाची पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे. दिल्लीच्या सर्व सीमांवर हे आंदोलन सुरू आहे त्यामुळे पंतप्रधानांचे गुरुद्वाराला भेट देणे या घटनेला विशेष महत्त्व दिले जात आहे.