नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दणक्यात एन्ट्री घेतली आहे. गुजरातमधील महानगरपालिकेच्या निवडणुकीत 27 जागांवर विजय मिळवून आम आदमी पार्टीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसह काँग्रेसपुढेही मोठे आव्हानच निर्माण केले आहे.
2013 मध्ये काँग्रेसच्या राजवटीला कंटाळून दिल्लीकरांनी केजरीवाल यांच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्या होत्या. त्यानंतर देशात भाजपची सत्ता आली, पण दिल्लीकरांनी 2015मध्येही केजरीवाल यांनाच पसंती दिली होती. आता गुजरातमध्येही आम आदमी पार्टीला याच चमत्काराची अपेक्षा आहे आणि त्यासाठी पहिले पाऊलही त्यांनी दणक्यात टाकले आहे.
गुजरातमध्ये काँग्रेस हा दुसरा मुख्य पक्ष आहे. परंतु, महापालिकेच्या राजकारणातून काँग्रेसला हद्दरपार करण्यात केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने मोठा हातभार लावला. अख्ख्या गुजरातमध्ये महानगरपालिकेत काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही.
भाजपने 576 पैकी 483 आणि आपने 27 जागांवर झेंडा गाडला आहे. तर एमआयएमने 7 जागांवर विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे दिड वर्षांनी होऊ घातलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसपुढे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.
अरविंद केजरीवाल यांनी गुजरातच्या जनतेचे नव्या राजकारणाची सुरुवात करण्यासाठी अभिनंद केले आहे. ‘गुजरातच्या जनतेने कामाच्या राजकारणाला मतदान केले. ते भाजप आणि काँग्रेसच्या राजकारणाने त्रस्त झाले होते. त्यांना एक तिसरा पर्याय हवा होता आणि तो पर्याय म्हणून त्यांनी आम आदमी पार्टीला निवडले आहे,’ असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
आता आगामी विधानसभा निवडणूक फक्त आप आणि भाजपमध्ये होईल, असे विधान करून त्यांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे. तर त्याचवेळी काँग्रेसला प्रतिस्पर्धी मानत नसल्याचेही स्पष्ट केले आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी गुजरातमधील सेटींगच्या राजकारणाचा अंत झाला असल्याचे म्हटले आहे.
आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी काँग्रेसला भाजपचे आक्सीजन म्हटले आहे. काँग्रेस देशभरातून संपत आहे आणि त्याचाच फायदा भाजपला मिळत आहे. त्यामुळे तिसरा पर्याय उभा होणे अत्यंत आवश्यक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
भाजप नव्हे काँग्रेससाठी धोकादायक?
गुजरातमध्ये 27 जागांवर विजय मिळविणारा केजरीवाल यांचा पक्ष भाजपसाठी नव्हे तर काँग्रेससाठी धोकादायक समजला जात आहे. दिल्लीमध्ये एेकेकाळी पहिल्या क्रमांकावर असलेला काँग्रेस पक्ष आज लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर जाऊन पडला आहे.
दिल्लीतील निवडणुका आप विरुद्ध भाजप अश्याच होत आहेत. दिल्लीसारखा चमत्कार गुजरात विधानसभा निवडणुकीत होणे अशक्य मानले जात असले तरीही दिड वर्षांनंतर काँग्रेसमात्र गुजरातमधून हद्दपार झालेली असेल, असे चित्र नक्कीच आहे.
इतर राज्यांमध्ये आप कुठे?
दिल्लीबाहेर थोड्याफार प्रमाणात पंजाब वगळता इतर कुठल्याच राज्यांमध्ये आम आदमी पार्टीला आपली क्षमता सिद्ध करता आलेली नाही. कुठे स्थानिक स्वराज्य संस्था तर कुठे एखाद दुसरी विधानसभा व लोकसभेची जागाच त्यांना जिंकता आलेली आहे. पण दिल्लीप्रमाणे सत्तेच्या चाव्या हाती घेण्याचे आपचे मनसुबे इतर राज्यांमधील प्रमुख पक्षांनी पूर्ण होऊ दिले नाही.
महाराष्ट्रात तर आप आणि मनसे यांची सारखीच स्थिती आहे. केवळ हिमाचल, जम्मू–काश्मीर आणि गोव्यात काही जागा आपच्या नावावर आहेत. त्यामुळे गुजरातमध्ये आप काय करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.