मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या फेसबुक पेजवर एका वृद्ध महिलेचे छायाचित्र पोस्ट केले आहे. या फोटोत मोदी या महिलेपुढे वाकून उभे आहेत आणि आशिर्वाद घेत आहेत.
पंतप्रधान गुरुवारी तामिळनाडूच्या कोईंबतूरमध्ये होते. या दरम्यान त्यांनी तिरप्पुर, मदुराई आणि तिरुचिरापल्ली या जिल्ह्यांमध्ये ४ हजार १४४ घरांचे उद्घाटन केले. यादरम्यान त्यांनी अनेक विकासकामांचे भूमीपुजनही केले. या साऱ्या दौऱ्यात १०६ वर्षांच्या अम्मासोबत पंतप्रधानांचे छायाचित्र सर्वाधिक हिट ठरले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून हे छायाचित्र शेअर करण्यात आले आहे. यात मोदी यांच्या डोक्यावर १०६ वर्षांची अम्मा पप्पाम्मल हात ठेवून आशिर्वाद देताना दिसत आहे. पंतप्रधानांनी हा फोटो शेअर करताना लिहीले आहे की, ‘कोईंबतूरमध्ये असाराधण अश्या पप्पाम्मल यांची भेट घेतली. कृषी आणि सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रात अविस्मरणीय कामासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे‘. त्यामुळे अम्माबाबत थोडे जाणून घेऊ या…
देशातील सर्वांत वृद्ध शेतकरी
१०६ वर्षांची आर. पप्पाम्मल ही तामिळनाडूत सेंद्रिय शेतीसाठी चर्चेत आहे. असेही मानले जाते की ती देशातील सर्वांत वृद्ध शेतकरी आहे, जी आजही शेतकामात स्वतः सक्रीय आहे. कोईंबतूर परीसर नीलगिरी हिल्ससाठी प्रसिद्ध आहे. १९१४ मध्ये कोईंबतूरच्या देवलापुरममध्ये पप्पाम्मल यांचा जन्म झाला. त्या लहान असतानाच त्यांच्या आई–वडिलांनाचा मृत्यू झाला. त्यानंतर दोन्ही बहिणींचे पालन पोषण आजीने केले.
कुटुंबात आधीपासून असलेल्या एका दुकानाची जबाबदारी सांभाळली आणि खाद्य पदार्थांचेही एक दुकान टाकले. यातून आलेल्या पैश्यांतून त्यांनी ३० वर्षाच्या वयात गावात १० एकर जमीन खरेदी केली. त्याच आधारावर त्यांनी आपल्या बहिणीच्या मुलांनाही सांभाळले आणि मोठे केले. गेल्या ७० वर्षांमध्ये सेंद्रिय शेतीसाठी त्या तामिळनाडूच नव्हे तर संपूर्ण देशासाठी प्रेरणा बनून पुढे आल्या. पहाटे साडेपाचला त्यांचा दिवस सुरू होतो आणि सहापर्यंत ती शेतात असते.
सेंद्रिय शेतीचे तंत्र आणि फायदे सांगतात
या वयातही अम्मा दररोज अडिच एकर शेतात दररोज काम करते. बाजरी, भेंडी आणि केळी अनेक पिके ती सेंद्रिय शेतीच्या आधारावर घेते. तामिळनाडू कृषी विद्यापीठाच्या शिक्षण विभागाशीही अम्मा जुळलेल्या आहेत. अनेक सेमिनार आणि कॉन्फरन्समध्ये त्या सेंद्रिय शेतीचे तंत्र आणि फायदे सांगतात.
पद्मश्री पुरस्काराने गौरव
अम्माला याच वर्षी भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरविले. त्यांना पद्मश्री जाहीर झाला तेव्हा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने ट्वीट करून म्हटले होते की, ‘वय ही केवळ एक संख्या आहे. १०५ वर्षांची अम्मा सेंद्रिय शेतीच्या पद्धतीत एक लिजेंड आहे. आजही त्या आपल्या शेतात काम करतात. त्यांना नमन.