नवी दिल्ली – कोविड-१९ वरची लसीचे उत्पादन व वितरण यासंबंधीचा व्यक्तिशः आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज (२८ नोव्हेंबर) तीन शहरांना भेटी दिल्या. इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान एकाच दिवशी तीन औषध कंपन्यांच्या प्रकल्पांना भेट देत आहेत. या तिन्ही ठिकाणी त्यांनी कोरोना लसीच्या सद्यस्थितीची माहिती घेतली.
पहिल्या टप्प्यात ते अहमदाबाद येथील झायडस बायोटेक पार्कमध्ये दाखल झाले. झिकोव्ह डी या लसीच्या निर्मिती प्रक्रिया, उत्पादन व वितरण या संबंधीची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर मोदी हे पुण्यात दाखल झाले. तेथे त्यांनी सिरम इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन कोविशिल्ड या लसीच्या निर्मितीची माहिती घेतली. सिरम इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग डायरेक्टर सायरस पुनावाला आणि सीईओ अदर पुनावाला हे यावेळी उपस्थित होते. त्यांनी पंतप्रधानांचे स्वागत करुन त्यांना इन्स्टिट्यूट मधील लसीच्या उत्पादन प्रक्रियेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी कॉन्फरन्स रुममध्ये संवाद साधला.
तिसऱ्या टप्प्यात मोदी यांनी हैद्राबाद येथील भारत बायोटेकच्या प्रकल्पाला भेट दिली. तेथील लस संशोधन कार्याची पाहणी केली. येथील शास्त्रज्ञांशी चर्चा करुन पूर्वतयारी, आव्हाने तसेच नागरिकांना ही लस देण्याबाबतच्या आराखड्याची थेट माहिती प्रधानमंत्री स्वतः घेतली. या दौऱ्यामुळे त्यांना देशातील कोरोना लसीची सद्यस्थिती, उत्पादन याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे लस उपलब्ध होताच ती सर्वांना उपलब्ध करुन देण्याबाबतचे नियोजन केंद्र सरकारकडून अचूकरित्या केले जाणार आहे.