नाशिक – ऐतिहासिक मोडी लिपीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्पर्श झाला आहे. नाशिकचे मोडी लिपी मार्गदर्शक सोज्वळ साळी यांच्या संकल्पनेतून व्हॉटस्अॅपद्वारे मार्गदर्शन वर्ग सुरु आहेत. प्रामुख्याने नोकरदार वर्गाला मोडी लिपीचे शिक्षण मिळावे यासाठी साळी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मोडी लिपी आत्मसात करणे आता सहज शक्य झाले आहे.
सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार व्हावा याउद्देशाने मोडी लिपीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. ऐतिहासिक शब्दरचना समजून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. त्याचप्रमाणे मोडी लिपीमध्ये उपलब्ध असलेले कागदपत्र समजून घेण्याकडे अनेकांचा कल असतो.
मोडी लिपीचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या नोकरदार वर्गाला प्रत्यक्ष वर्गासाठी हजर राहता येत नसल्याने साळी यांनी व्हॉटस्अँपद्वारे प्रशिक्षण वर्ग सुरु केले.सध्या कोरोनाच्या काळात एकत्र येवून वर्ग घेण्यास तूर्तास परवानगी नसल्याने व्हॉटस्अँपद्वारे प्रशिक्षणला पसंती दिली जात आहे. यात बाराखडी, जोडाक्षरे, पत्रवाचन याविषयी मार्गदर्शन करण्यात येते. दोन महिन्यांचा एक वर्ग असून आजपर्यंत १० वर्ग घेतल्याचे साळी यांनी सांगितले.
दुहेरी मांडणी सारखे काही प्रकार न समजल्यास फोनद्वारे विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले जाते. मोडी लिपितील अक्षरांची तोंड ओळख व्हावी यासाठी ग्रुपवर बाराखडी नुसार फोटो पाठवले जातात. नाशिक शहराची विविधांगी ओळख ठरत असतांना आता मोडी लिपीच्या प्रशिक्षणवर्गामुळे नाशिकीची नवी ओळख निर्माण झाली आहे.
—
बहुतांश नोकरदार वर्गाला कामाच्या वेळेनुसार प्रत्यक्ष वर्गाला उपस्थित राहणे शक्य होत नाही. यावर उपाय म्हणून व्हॉटस्अँपद्वारे ग्रुप तयार करून त्यावर प्रशिक्षण वर्ग सुरु केला. सध्याच्या कोरोनाच्या काळात प्रत्यक्ष वर्ग घेणे देखील शक्य नाही त्यामुळे आधीच करून ठेवलेल्या उपायाला सध्या मोठ्या प्रमाणात पसंती मिळते आहे. प्रशिक्षणवर्गात मोडी लिपीचे संपूर्ण शिक्षण दिले जाते.
– सोज्वळ साळी, मोडी लिपी प्रशिक्षक