कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सीटूची मागणी
नाशिक – जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत असल्याने जिल्ह्यातील मोठ्या उद्योगांनी नाशिक, सिन्नर, दिंडोरी व इगतपुरी येथे कोरोना केअर सेंटर आणि डेडिकेटेड हॉस्पिटल उभारावेत, अशी मागणी सीटूने केली आहे.
सीटूने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील सातपूर, अंबड, दिंडोरी, इगतपुरी, सिन्नर या तालुक्यांमध्ये औद्योगिक कामगारांमध्ये कोरोना लागण होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही कोरोनाचा गावागावांमध्ये प्रसार होत आहे. परिणामी वाढत्या रुग्णांचे विलगीकरण करणे व त्यांना उपचार उपलब्ध करणे कामी अनेक अडचणी येत आहेत. अनेक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही व त्यांना अनेक हॉस्पिटलच्या चकरा माराव्या लागत आहेत. तसेच खासगी हॉस्पिटलकडून या रुग्णांना अवाजवी बिले आकारून प्रचंड पिळवणूक केली जात आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील मोठ्या उद्योगांनी कोरोना केअर सेंटर व डेडिकेटेड कोरोना हॉस्पिटल उभारण्यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मोठ्या उद्योगांशी चर्चा करावी. या उद्योगांनी असे कोरोना सेंटर आणि हॉस्पिटल उभारावे, अशी मागणी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे व जिल्हा सरचिटणीस देवीदास आडोळे यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन सीटूने पालकमंत्र्यांना दिले आहे. या प्रकरणी कामगार संघटना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार असल्याचे कराड यांनी निवेदनात म्हटले आहे.