इंडिया दर्पण EXCLUSIVE
नाशिक – ओझर येथील विमानतळावरुन प्रवासी विमानसेवेने मोठे उड्डाण घेतले असून आता नॉन स्टॉप कोलकाता विमानसेवा सुरू होत आहे. येत्या २८ मार्चपासून ही सेवा सुरू होणार आहे. आघाडीच्या स्पाईसजेट कंपनीने ही घोषणा केली आहे. त्यामुळे नाशिकच्या विमानसेवेला आणखी वेग येणार आहे. नाशिकशी देशातील आणखी एक महत्त्वाचे शहर यानिमित्ताने जोडले जाणार आहे. अवघ्या दीड ते २ तासात नाशिककर कोलकाता येथे पोहचणार आहेत.
विशेष म्हणजे, सध्या नाशिकहून सुरू झालेल्या सर्व सेवा या केंद्र सरकारच्या उडान या योजनेअंतर्गत आहेत. मात्र, प्रथमच उडान या योजनेशिवाय नाशिकमधून कोलकातासाठी विमानसेवा सुरू होणार आहे. यासंदर्भात स्पाईसजेट कंपनीने सर्वेक्षण केले असून नाशिक-कोलकाता सेवेला मोठा प्रतिसाद लाभण्याची कंपनीला खात्री आहे. हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)च्या उत्तम सहकार्यामुळेच नाशिक विमानसेवा गती घेत आहे.
एक वाईट निर्णय
स्पाईसजेटने नाशिक ते हैदराबाद ही सेवा सुरू केली होती. मात्र, या सेवेला उत्तम प्रतिसाद न मिळाल्याने येत्या १ फेब्रुवारीपासून ही सेवा बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. दरम्यान, अलायन्स एअर या कंपनीकडूनही नाशिक-हैदराबाद सेवा दिली जात आहे. त्यामुळेच स्पाईसजेटला फारसे प्रवासी मिळाले नसल्याचे सांगितले जात आहे.
सध्या सुरू असलेल्या सेवा
अलायन्स एअर – नाशिक-हैदराबाद, नाशिक-पुणे, नाशिक-अहमदाबाद
ट्रुजेट – नाशिक-अहमदाबाद
स्पाईसजेट – नाशिक-नवी दिल्ली, नाशिक-हैदराबाद, नाशिक-बंगळुरू
स्टार एअर – नाशिक-बेळगाव (२५ जानेवारीपासून)