नाशिक – शहर परिसरात लाच घेण्याचे प्रकार वाढतच असून मंगळवारी लाचलुतपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई केली आहे, सातपूर पोलिस स्टेशनमध्ये एसीबीने सापळा रचून ३ पोलिस शिपायांना रंगेहाथ पकडले आहे. पोलिस नाईक हिरामण गणपत सोनवणे, सारंग एकनाथ वाघ आणि राहूल पोपट गायकवाड अशी तिन्ही पोलिस नाईक यांची नावे आहेत.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीविरुद्ध सातपूर पोलिस स्टेशनमध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये अटक न करण्यासाठी या तिन्ही पोलिस नाईक यांनी संबंधिताकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. ही रक्कम दोन टप्प्यातही देण्याचे निश्चित करण्यात आले. याप्रकरणी एसीबीकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यानुसार, पहिल्या हफ्त्याची रक्कम १३ हजार रुपये घेताना हिरामण सोनवणे, सारंग वाघ आणि राहूल गायकवाड हे तिन्ही पोलिस नाईक रंगेहाथ पकडले गेले. त्यामुळे या तिघांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. तसेच, पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, लाच देणे व घेणे गुन्हा असून याप्रकरणी तक्रारीसाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.