नवी दिल्ली – केंद्र सरकारतर्फे पुढील टप्यात देशातील सैनिकी शाळांमध्ये ओबीसी वर्गाला आरक्षण देण्यात येणार आहे. यासंबंधी केंद्राने भूमिका स्पष्ट केली आहे. याअंतर्गत २७ टक्के जागा या ओबीसीं वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित ठेवल्या जाणार आहे. रक्षा सचिव अजय कुमार यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.याआधी केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालय येथे आरक्षण दिले गेले आहे.
रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत देशातील ३३ सैनिकी विद्यालये कार्यरत आहेत. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात सैनिकी शाळांमध्ये ओबीसींना आरक्षण दिले जाईल असे ट्विट अजय कुमार यांनी केले आहे. तसेच याबाबत १३ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले परिपत्रक त्यांनी ट्विट केले आहे. ६७ टक्के जागा या संबंधित राज्यातील विद्यार्थ्यांसाठी असून उर्वरित ३३ टक्के जागा इतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. ‘सूची अ’ आणि ‘सूची ब’ असे वर्गीकरण करण्यात आले असून यात १५ टक्के जागा अनुसूचित जाती, तर ७.५ टक्के जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत. २७ टक्के जागा या ओबीसी वर्गासाठी आरक्षित ठेवल्या जाणार आहेत. हा निर्णय २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांपासून लागू असेल अशी माहिती अजय कुमार यांनी दिली आहे.