नवी दिल्ली – एकीकडे शेतकऱ्यांचे राजधानी दिल्लीत मोठे आंदोलन सुरू असताना केंद्रीय मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. साखरेच्या निर्यातीतून जे ५ कोटी रुपये केंद्र सरकारला मिळणार आहेत ते सर्व पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निश्चित झाले आहे. तशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखाने हे दोन्ही सध्या मोठ्या संकटाचा सामना करीत आहेत. त्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे जावडेकर यांनी म्हटले आहे. केंद्र सरकार ६० लाख टन साखर निर्यात करणार आहे. त्याद्वारे तब्बल ५ कोटी रुपये सरकारला मिळणार आहेत. मात्र, ही रक्कम सबसिडीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. यंदा देशात ३०० लाख टनाहून अधिक साखरेचे उत्पादन होणार आहे. देशांतर्गत मागणी ही २६० लाख टनाची आहे. त्यामुळे उर्वरीत साखर निर्यात केली जाणार आहे, असे जावडेकर यांनी सांगितले आहे.