नवी दिल्ली ः उच्चशिक्षित व्यक्तीने आपल्या जीवनसाथीचे करिअर आणि प्रतिष्ठा मलीन करणे, त्याचे नुकसान करणे ही मानसिक क्रूरताच असल्याचा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं एका प्रकरणात दिला आहे. पत्नीकडून झालेल्या व्यवहाराला मानसिक क्रूरता मानून पतीची घटस्फोटाची याचिका न्यायालयाने स्वीकारली.
न्यायाधीश संजय किशन कौल, न्यायाधीश दिनेश महेश्वरी आणि न्यायाधीश हृषीकेश राय यांच्या खंडपीठानं पतीची याचिका स्वीकारून उत्तराखंड उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला आणि कौटुंबिक न्यायालयानं दिलेला घटस्फोटाचा निर्णय कायम ठेवला.
सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं की, पती-पत्नीचे तुटलेले संबंध मध्यमवर्गीयांच्या वैवाहिक आयुष्याचा एक भाग आहे, हे उच्च न्यायालयाचं म्हणणं चुकीचं आहे. हे प्रकरण निश्चितच पत्नीकडून पतीशी केलेली क्रूरता आणि त्या आधारावर पतीला घटस्फोट मिळण्याचा अधिकार आहे.
जीवनसाथीसोबत राहावं न वाटणं आणि वैवाहिक आयुष्य निभावणं असंभव होणं या मार्यादेपर्यंत मानसिक क्रूरता आल्यास दांपत्य घटस्फोट घेऊ शकतं. प्रत्येक दाम्पत्याची सहन करण्याची क्षमता वेगवेगळी असू शकते. मानसिक क्रूरतेच्या आधारावर घटस्फोटाचा निर्णय देताना पक्षकारांचे शिक्षण, त्यांची समाजातली स्थिती लक्षात घेऊन न्यायालायनं निर्णय देणं अपेक्षित आहे, असं खंडपीठानं म्हटलं आहे.
पत्नीकडून पतीच्या तक्रारी
या प्रकरणात पत्नीने पतीविरुद्ध लष्कराच्या मोठ्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा अपमानकारक तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे पतीविरुद्ध लष्करानं चौकशी लावली होती. यामुळे पतीची प्रगती आणि करिअरवर परिणाम झाला. तसंच पत्नीनं राज्य महिला आयोगासारख्या संस्थांकडेही पतीविरुद्ध तक्रारी केल्या होत्या. इतर प्लॅटफॉर्मवरही पतीविरुद्ध अपमानकारक पोस्ट लिहिल्या. याचा परिणाम पतीचे करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेवर त्याचा परिणाम झाला, असं खंडपीठानं म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण
या प्रकरणात पती एम टेक झालेला असून, लष्करातील अधिकारी आहे आणि पत्नी पीएचडी प्राप्त आहे. शासकीय महाविद्यालयात ती प्राध्यापिका आहे. दोघांचे लग्न २००६ मध्ये लग्न झालेलं होतं. काही महिन्यातच लग्नानंतर त्यांचं बिनसलं. एका वर्षानंतर दोघेही वेगवेगळे राहू लागले. पतीनं कौटुंबिक न्यायालयात अर्ज करून घटस्फोट मागितला.
पत्नीनं अनेक तक्रारी केल्या, आरोप लावल्यानं त्याच्या करिअरचं नुकसान झालं तसंच त्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागला, या आशयाचा अर्ज पतीनं कौटुंबिक न्यायालयात केला. पत्नीचा हा व्यवहार मानसिक क्रूरता आहे, त्यामुळे घटस्पोट द्यावा. तर पत्नीनं याचिका दाखल करून संबंध पुनर्स्थापित करावे अशी मागणी केली होती. कौटुंबिक न्यायालयानं पुराव्यांच्या आधारे घटस्फोटाची याचिका मंजूर केली. परंतु उच्च न्यायालयानं कौटुंबिक न्यायालयाची याचिका फेटाळत पती-पत्नीचे संबंध पुनर्स्थापित करण्याची याचिका मंजूर केली होती.